Dadra Nagar Haveli MP Mohan Sanjibhai Delkar's suicide note names Gujarat officials and former ministers

दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन संजीभाई डेलकर (५९) यांनी मरिन ड्राइव्ह येथील सी ग्रीन साउथ हॉटेलच्या रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. घटनास्थळावरून पोलिसांना एक सुसाइड नोट सापडली आहे. त्यात गुजरातचे अधिकारी आणि माजी मंत्र्याची नावे समोर आली आहेत. या प्रकरणी मरिन ड्राइव्ह पोलीस अधिक तपास करत आहेत.

    मुंबई : दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन संजीभाई डेलकर (५९) यांनी मरिन ड्राइव्ह येथील सी ग्रीन साउथ हॉटेलच्या रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. घटनास्थळावरून पोलिसांना एक सुसाइड नोट सापडली आहे. त्यात गुजरातचे अधिकारी आणि माजी मंत्र्याची नावे समोर आली आहेत. या प्रकरणी मरिन ड्राइव्ह पोलीस अधिक तपास करत आहेत.

    सोमवारी डेलकर हे सी ग्रीन साउथ हॉटेलच्या पाचव्या मजल्यावरील रूममध्ये थांबले होते. सकाळी ११ वाजता त्यांच्या ड्रयव्हरने फोन केला. मात्र, अनेकदा फोन करुनही त्यांनी कॉल न उचलल्याने ड्रायव्हरने याबाबत त्यांच्या कुटुंबीयांना सांगितले. कुटुंबीयांनीही त्यांना फोन केले. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर, हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनीही कॉल केले. मात्र, काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर रूमच्या दुसऱ्या चावीने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करण्यात आला.

    दरवाजा न उघडल्याने दुपारी १२च्या सुमारास याबाबत हॉटेलकडून पोलिसांना कळविण्यात आले. त्यानुसार, मरिन ड्राइव्ह पोलीस हॉटेलमध्ये दाखल झाले. दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. डेलकर यांच्या चालकाने बाजूच्या विंगमधील पाचव्या मजल्यावरील गॅलरीतून त्यांच्या गॅलरीत उडी मारण्याचा प्रयत्न केला. यात तो खाली कोसळणार होता. हे त्याच्या जिवावर बेतले असते. मात्र, मालकाकडे जाण्यासाठी त्याची धडपड सुरू होती. अखेर तो गॅलरीत उडी घेण्यात यशस्वी झाला. त्यावेळी डेलकर हे शालच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले.

    या प्रकरणी मरिन ड्राइव्ह पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. डेलकर हे सात वेळा खासदार होते. तणावातून त्यांनी हे पाऊल उचलले असल्याचा प्राथमिक अंदाज असून, सुसाइड नोटच्या मदतीने पोलीस अधिक तपास करत आहेत.

    मोहन डेलकर यांच्या मृतदेहाशेजारी गुजराती भाषेत लिहिलेली सुसाइड नोट पोलिसांना सापडली आहे. या नोटमध्ये गुजरातच्या काही बड्या अधिकाऱ्यांच्या नावांचा समावेश असल्याचे समजते. मात्र, ही नावे नेमकी कोणाची आहेत याबाबत पोलिसांनी कुठलीही माहिती दिली नाही.
    डेलकर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण समोर येईल असे पोलिसांनी सांगितले.