जनतेमध्ये स्थान नसलेल्या काही राजकीय पक्षांकडून निर्बंधाच्या काळातही दहीहंडीचे राजकारण; संजय राऊतांचा मनसेला टोला

राज्यात काही पक्षांना जनतेने नाकारले आहे, परंतु चर्चेत राहण्यासाठी काही पक्षांचे नेते अनेक मुद्द्यांवर वक्तव्य करत असतात, महाराष्ट्र सरकार टप्प्याने निर्बंधात सूट देत आहे. मात्र काही राजकीय पक्षांना जनतेमध्ये बेस नाही ते आज अशा गोष्टी करत आहे. केंद्राने बंधन घातली आहेत. केंद्र सरकारने सणांच्या काळात निर्बंध ठेवण्याच्या सूचना दिल्यात हे त्यांना कळत नाही अश्या शब्दात खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या टिकेला उत्तर दिले आहे.

    मुंबई : राज्यात काही पक्षांना जनतेने नाकारले आहे, परंतु चर्चेत राहण्यासाठी काही पक्षांचे नेते अनेक मुद्द्यांवर वक्तव्य करत असतात, महाराष्ट्र सरकार टप्प्याने निर्बंधात सूट देत आहे. मात्र काही राजकीय पक्षांना जनतेमध्ये बेस नाही ते आज अशा गोष्टी करत आहे. केंद्राने बंधन घातली आहेत. केंद्र सरकारने सणांच्या काळात निर्बंध ठेवण्याच्या सूचना दिल्यात हे त्यांना कळत नाही अश्या शब्दात खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या टिकेला उत्तर दिले आहे.

    काहीजणांचे सणांच्या नावाखाली राजकारण

    केरळला थोडी सूट दिली आणि तिसरी लाट सुरु झाली. तिथे मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून आलेत, त्यामुळे राज्यात कोरोनाचे काही निर्बंध लावण्यात आलेत, परंतु काहीजण सणांच्या नावाखाली राजकारण करु पाहत आहेत, असा राऊत यांनी अप्रत्यक्षरित्या टोला मनसेला लगावला आहे.

    त्यांना हिंदुत्वविरोधी म्हणणार का?

    दहीहंडी आणि गणेशोत्सवात महाराष्ट्र सरकारने काळजी घेण्याची गरज आहे. महाराष्ट्र तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर आहे. मंदिर उघडण्यासाठी आंदोलन केले जाते त्यांच्यावर केंद्र सरकार कारवाई करणार का? आम्ही कारवाई केली तर आम्हाला हिंदुत्त्वविरोधी म्हणून टीका केली जाते. केंद्राने दिलेल्या मार्गदर्शक सूचना अमित शाह यांच्या मंत्रालयाच्या आहेत. त्यांना हिंदुत्वविरोधी म्हणणार का?, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. राज्यात दहीहंडी साजरी करण्यासाठी मनसे आक्रमक झाल्याचे पाहयला मिळाले, यावर राऊतांनी मनसेवर अप्रत्यक्ष टीका करत मनसेला लक्ष्य केले.

    भाजपचे समन्स आहे की ईडीचे

    भाजपचे नेते समूह माध्यमांवर शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची यादी जाहीर करतात. त्यांनाच ईडी बोलावते त्यामुळे भाजपचे समन्स आहे की ईडीचे आहे हे समजले पाहिजे. भाजपच्या नेत्यांनी शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांची यादी जाहीर केली त्या क्रमाने त्यांना बोलावणार असा दावा करतात. अनिल परब यांना समन्स आले आहे. मात्र, ते जाणार नाहीत. सीबीआय आणि ईडी भाजप चालवत आहेत की सीबीआय आणि ईडीला भाजप चालवत आहे ते समजले पाहीजे असे ते म्हणाले.