daily needs items are very expensive for the peoples
भडका : महंगाई डायन खाये जात हैं..., पालेभाज्या, फळभाज्या अवाक्याबाहेर

नवराष्ट्र न्यूज नेटवर्क, मुंबई.

सरकारने कितीही दावे केले की महागाई आटोक्यात आहे, तरी वास्तव काही वेगळेच असल्याचे दिसून येत आहे. आता ‘महंगाई डायन खाये जात है’, हेच गाणं म्हणायची वेळ गरिबांवर आली आहे. या महागाईत सर्वसामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. कांदा, बटाटा, तेल, राई, जिरे, पालेभाज्या, फळभाज्या, फळे या सर्वांची किंमत ४ ते ५ पट महाग झाल्या आहेत. त्यावर सरकारचे काहीही नियंत्रण नाही. कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या जनतेसमोर जगावे की मरावे असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

गृहिणींची मोठी कसरत

कोरोना काळात रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी जास्तीतजास्त हिरव्या पालेभाज्या खाव्यात, असा सल्ला तज्ज्ञ देतात. मात्र, मार्केटमध्ये गेल्यावर भाज्यांचे भाव ऐकून अक्षरशः चक्कर येण बाकी असते. अपवाद वगळता सर्वच भाज्या महागल्या आहेत. तुटपुंज्या बजेटमध्ये ताळमेळ बसविताना गृहिणींची मोठी कसरत होत आहे. कोरोनामुळे रोजगार जाऊन आर्थिक चणचण वाढली आहे. तर दुसरीकडे वाढत्या महागाईला तोंड देताना सामान्यांचे हाल होत आहेत. डाळींच्या उत्पादनावर परिणाम झाल्याने डाळींच्या किमती वाढल्याचे कारण सांगितले जात आहे. तर तेलाचे दर देखील वाढले आहेत.

आवक मर्यादित

कोरोनाचे संकट आणि आठवडी बाजार बंद असल्यामुळे सध्या मंडई परिसरात भाजीपाला विक्रेते दिसत आहेत. इतर ठिकाणचे आठवडी बाजार अद्याप भरवले जात नाहीत. त्यामुळे भाजीपाला विक्रेत्यांनी ठराविक ठिकाणी विक्री सुरू आहे; तर काहीजण फिरून भाजीपाला विकत आहेत. त्यामुळे काही दिवस भाजीपाला आवक मर्यादितच आहे. तशात परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे भाजीपाल्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे आवक थंडावली आहे. त्याचा परिणाम दरवाढीवर झाला आहे.

असे आहेत भाजीपाला आणि फळांचे दर :

भाजीपाला, फळे दर
बटाटा  ३५ ते ४० ₹ किलो
कांदे ३५ ते ४५ ₹ किलो
टोमॅटो ३० ते ४० ₹ किलो
लवंगी मिरची ८० ₹ किलो
आलं १६० ₹ किलो
लसूण १६० ₹ किलो
वाटाणे  १०० ते १२० ₹ किलो
शिमला मिरची ८० ₹ किलो
गवार ६० ते ८० ₹ किलो