कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका: कटू निर्णय घेण्याची तयारी; मुख्यमंत्र्यांचे लॉकडाऊनबद्दल सूचक विधान

कोरोनाच्या उच्चांकात राज्याच्या हितासाठी लॉकडाऊनचा निर्णय घेतला आणि त्यासंदर्भात वेळोवेळी सांगितलेले आहे की, कटूपणा घेण्याची माझी तयारी आहे. तो निर्णय आपल्याला घ्यावा लागला आणि नागरिकांनी खरोखर मनापासून सहकार्य केले. त्यामुळे हे जे काही नियंत्रण आलेले आहे, मात्र अजून यश मिळालेले नाही, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी अप्रत्यक्षपणे 1 जूननंतर निर्बंध वाढविण्याचे संकेत दिले.

    मुंबई : देशातील काही राज्यांत कोरोनाच्या दुसऱ्या संसर्गाची लाट कमी होताना दिसत असली, तरी धोका कायम आहे. महाराष्ट्रात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा धोका असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर लहान मुले आणि बालकांमधील कोविड संसर्ग रोखण्यासाठी बाल रोगविषयक टास्क फोर्सची स्थापन करण्यात आली आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी टास्क फोर्ससह राज्यातील बालरोग तज्ञांना मार्गदर्शन केले.

    दुसरीकडे लॉकडाउन वाढवण्याकडेच इतर राज्यांचा कल दिसून येत असून या बैठकीत ठाकरे यांनी लॉकडाऊनसंदर्भात सूचक विधान करताना कटूपणा घेण्याची माझी तयारी आहे, असे म्हटले आहे.

    मुख्यमंत्री म्हणाले, कोरोनाच्या उच्चांकात राज्याच्या हितासाठी लॉकडाऊनचा निर्णय घेतला आणि त्यासंदर्भात वेळोवेळी सांगितलेले आहे की, कटूपणा घेण्याची माझी तयारी आहे. तो निर्णय आपल्याला घ्यावा लागला आणि नागरिकांनी खरोखर मनापासून सहकार्य केले. त्यामुळे हे जे काही नियंत्रण आलेले आहे, मात्र अजून यश मिळालेले नाही, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी अप्रत्यक्षपणे 1 जूननंतर निर्बंध वाढविण्याचे संकेत दिले.

    मुख्यमंत्री म्हणाले, पहिल्या लाटेत ज्येष्ठ नागरिकांना संसर्ग झाला. सध्या दुसरी लाट आहे. ज्यात आपण अनुभवतोय की युवा आणि मध्यमवयीन नागरिकांना संसर्ग होत आहे. आता मुलांचा वर्ग राहिलेला आहे आणि त्याच्यात ही लाट येण्याची शक्यता आहे. ही शक्यता वर्तवल्यानंतर आपण शांत बसणे हे काही शक्य नाही. कोरोनाविरोधातील लढण्यासाठी सर्वाधिक तयारी महाराष्ट्राने केली आहे, असे ठाकरेंनी नमूद केले.