डोंगर उतारावर राहणाऱ्यांना  धोक्याचा इशारा; सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याचे पालिकेचे आवाहन

येत्या पावसाळ्यात जोराच्या पावसाने दरडी कोसळण्याची तसेच पावसामुळे डोंगरावरुन येणा-या पावसाच्या पाण्याच्या लोंढयामुळे तसेच जोरदार पावसाने नाल्यांना पूर येऊन झोपड्या वाहून जाण्याची शक्यता असल्याने स्थानिक रहिवाशांनी स्वतःहून सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे.

    मुंबई:पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील डोंगर उतारावर राहणा-या रहिवाशांना धोक्याचा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे. पावसाळ्यात दरडी कोसळण्याचा धोका असल्याने येथील नागरिकांनी सुरक्षितस्थळी स्थलांतरीत होण्याचे आवाहन पालिकेने दिले आहे.

    मुंबईत अनेक ठिकाणी डोंगर उतारावरील झोपड्यांत नागरिक राहत आहेत. पावसाळ्या दरड़ी कोसळण्याची शक्यता असल्याने पावसापूर्वी येथील नागरिकांना स्थलांतरित करण्याचे आवाहन पालिकेकडून केले जाते. या पार्श्वभूमीवर ‘एम- पूर्व’ विभागातील दिनक्वारी मार्ग येथील गौतमनगर, पांजरापोळ तसेच वाशीनाका येथील ओम गणेश नगर, राहुल नगर, नागाबाबा नगर, सह्याद्री नगर, अशोक नगर, भारत नगर, बंजारतांडा, हशू अडवाणी नगर व एल. यू. गडकरी मार्ग येथील विष्णू नगर या ठिकाणच्या डोंगराच्या उतारावर वसलेल्या झोपडपट्टीवासियांना स्थलांतरीत करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

    येत्या पावसाळ्यात जोराच्या पावसाने दरडी कोसळण्याची तसेच पावसामुळे डोंगरावरुन येणा-या पावसाच्या पाण्याच्या लोंढयामुळे तसेच जोरदार पावसाने नाल्यांना पूर येऊन झोपड्या वाहून जाण्याची शक्यता असल्याने स्थानिक रहिवाशांनी स्वतःहून सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे, असे महापालिकेने सूचना केल्या आहेत. दरम्यान, स्थलांतर न करता तेथेच राहणा-या रहिवाशांनी स्वतःच्या जबाबदारीवर रहावे, नैसर्गिक आपत्तीने कोणत्याही प्रकारची दुर्घटना अथवा जीवित, वित्तहानी झाल्यास बृहन्मुंबई महापालिका प्रशासन त्यास जबाबदार राहणार नाही, असे पालिका प्रशासनाने म्हटले आहे.