दाऊदचा सहकारी फहीम मचमचचा कोरोनाने मृत्यू? चर्चांना ऊत

गँगस्टार फहीम मचमच हा गेल्या महिन्यापर्यंत मुंबईत सक्रिय होता. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घाटकोपरच्या एका व्यापाऱ्याला मचमचच्या नावाचा खंडणीचा फोन आला होता. हा कॉल २१ जूनला आले होते. संबंधित व्यापाऱ्याने पोलिसातही तक्रार दाखल केली होती. पण सर्व कॉल हे वीओआयपी (VOIP) नंबरहून करण्यात आले होते.

    मुंबई: कुख्यात गुंड फहीम मचमच याचा कोरोनाने मृत्यू झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा अत्यंत जवळचा म्हणून फहीम  मचमच ओळखला जात होता. फहीमचा मृत्यू पाकिस्तानमधील कराची शहरात झाला आहे. फहीम मचमच याच्यावर भारतात खून आणि खंडणीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे मुंबई क्राईम ब्रांच आणि दिल्ली पोलिसांचं स्पेशल सेल गेल्या अनेक वर्षांपासून त्याच्या शोधात होते.

    मचमच अनेक वर्षांपासून पाकिस्तानच्या कराचीत राहत होता. दाऊदच्या खूप जवळच्या आणि विश्वासू माणसांपैकी एक फहीम मचमच होता. भारतीय तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, डी कंपनीचा मुंबईतील वसुलीचा व्यवसाय तो हाताळत असे.दाऊद इब्राहिमचा व्यवसाय हाताळण्यासाठी फहीम मचमच अनेक वर्षांपासून कराचीत होता. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयशीही त्याचा संबंध होता. मुंबई पोलीस सध्या या वृत्ताची शाहनिशा करत आहेत.

    गँगस्टार फहीम मचमच हा गेल्या महिन्यापर्यंत मुंबईत सक्रिय होता. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घाटकोपरच्या एका व्यापाऱ्याला मचमचच्या नावाचा खंडणीचा फोन आला होता. हा कॉल २१ जूनला आले होते. संबंधित व्यापाऱ्याने पोलिसातही तक्रार दाखल केली होती. पण सर्व कॉल हे वीओआयपी (VOIP) नंबरहून करण्यात आले होते. त्यामुळे फोन करणारा नेमका फहीम मचमच हाच होता की दुसरा कुणी त्याचा आवाज वापरुन फोन करत होता, याचाही शोध पोलीस घेत आहेत.