दाऊदच्या बहुचर्चित ‘एसटीडी’चा मृत्यू, अंडरवर्ल्डमधील आख्यायिकेचा अंत

एसटीडीनं मुंबईतील एका छोट्या वृत्तपत्राचं ओळखपत्रदेखील मिळवलं होतं. हे आयकार्ड दिल्याबद्दल त्या वृत्तपत्राच्या संपादकाला दर महिन्याला २५ हजार रुपयांचं इनाम दिलं जायचं, अशीही माहिती सांगितली जाते. त्यावेळी पोलीस मुख्यालयात बातमीदारी करणाऱ्या इतर पत्रकारांना हा एसटीडी पार्टी द्यायचा आणि सर्वांशी मैत्री करण्याचा प्रयत्न करायचा.

नव्वदच्या दशकात जेव्हा दाऊद इब्राहिमच्या नावाची पूर्ण मुंबईत दहशत होती, तेव्हा कुख्यात गुंड छोटा शकील डी कंपनीच्या एका गुंडाला पत्रकाराचं रूप घेऊन मुंबई पोलीस मुख्यालयात पाठवत असे. हा गुंड पोलीस मुख्यालयातील सर्व बित्तंबातमी दाऊदपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असे.

या गुंडाचं नाव एसटीडी का पडलं, याची एक गंमतशीर गोष्ट आहे. पोलिसांकडून मिळालेल्या बातम्या तो डॉन दाऊद इब्राहिमपर्यंत पोहोचवण्यासाठी एका एसटीडी बुथचा वापर करायचा. त्यामुळे त्याचं नावच एसटीडी पडलं. या एसडीटीची आई दाऊदच्या बहिणींना कुराण शिकवायची, असंदेखील सांगितलं जातं. या तथाकथित पत्रकाराचं दक्षिण मुंबईतील राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या एसटीडीनं मुंबईतील एका छोट्या वृत्तपत्राचं ओळखपत्रदेखील मिळवलं होतं. हे आयकार्ड दिल्याबद्दल त्या वृत्तपत्राच्या संपादकाला दर महिन्याला २५ हजार रुपयांचं इनाम दिलं जायचं, अशीही माहिती सांगितली जाते. त्यावेळी पोलीस मुख्यालयात बातमीदारी करणाऱ्या इतर पत्रकारांना हा एसटीडी पार्टी द्यायचा आणि सर्वांशी मैत्री करण्याचा प्रयत्न करायचा. त्या बदल्यात या पत्रकारांकडून त्याला पोलिस मुख्यालयातील महत्त्वाच्या बातम्या मिळत असत.

एसटीडीवर कधीच कुणाला संशय आला नाही. मात्र एका पोलिस अधिकाऱ्याला त्याच्यावर संशय आल्यामुळे त्याच्यावर पाळत ठेवली जाऊ लागली. त्यानंतर एक दिवस त्याला अटक करण्यात आली. आझाद मैदान पोलीस क्लबमध्ये दरवर्षी जानेवारी महिन्यात वार्षिक पत्रकार परिषद होत असे. या पत्रकार परिषदेत गोळीबार करून काही पोलिसांना ठार करण्याचा छोटा शकीलचा मनसुबा होता. एसटीडीच्या मदतीनं हे काम पूर्ण करण्याचा कटही शिजत होता. मात्र पोलिसांच्या प्रेस रूममध्ये ड्युटीवर असणाऱ्या पोलिसांनी हा कट उधळून लावला.

या गुन्ह्यांची शिक्षा भोगून आल्यानंतर एसटीडी हा पोलिसांचाच खबरी बनला. अंडरवर्ल्डमधील अनेक गुपितं त्यानं पोलिसांना सांगितल्यामुळे पोलिसांना गुंडगिरी संपवण्यात त्याची मदत झाली.