After Maharashtra, Gujarat is a threat Prime Minister Narendra Modi discussed with Chief Minister Uddhav Thackeray; Took stock of the situation in Maharashtra

    मुंबई : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी राज्यातील रुग्णसंख्या मात्र पूर्णपणे कमी झालेली नाही. केवळ महाराष्ट्राचे नव्हे तर इतर सर्वच राज्यात लोकं घराबाहेर पडताहेत, गर्दी करताहेत, रिव्हेंज टुरिझम, रिव्हेंज शॉपिंग सुरू झाले आहे. धार्मिक, राजकीय कारणांसाठी गर्दी होऊ लागली आहे. हे थांबविण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहेच, पण केंद्रीय पातळीवरून ही गर्दी रोखण्यासाठी व्यापक स्वरूपाचे धोरण आखावे, अशी विनंती विनंती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी याना केली.

    कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी महाराष्ट्राने उचललेली ठोस पाऊले आणि तिसऱ्या संभाव्य लाटेसाठी नियोजन याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत दिली. केंद्र शासनाने देशातील सहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बैठक आयोजित केली होती, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. महाराष्ट्रातील रुग्णवाढ देशासाठी चिंतेचा विषय आहे, असे पंतप्रधान मोदी बैठकीत म्हणाले. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याची भूमिका मांडली. महाराष्ट्रात रुग्ण संख्या आणि मृत्यू दर कमी होत असला तरी आणखीही कमी होण्याची गरज आहे. फ्रंट लाईन वर्कर्सचे लसीकरणही वेगाने पूर्ण करीत आहोत, लसी वाया जाण्याचे प्रमाणही कमी केले आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

    मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, सध्या पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील मिळून 8 ते 10 जिल्ह्यांमध्ये अध्यापही संसर्ग आहे. या जिल्ह्यांमधील 18 वर्षांपुढील 2.06 कोटी जणांना पूर्ण लशीचे दोन्ही डोस देणे गरजेचे आहे. सध्या 87.90 लाख डोसेस इथे दिल्या आहेत. त्यामुळे जादाचे 3 कोटी डोस मिळाले तर प्राधान्याने या सर्व जिल्ह्यांत संपूर्ण लसीकरण करता येईल. याचबरोबर, केंद्राने दिलेल्या प्रमाणानुसार विचार करता, संभाव्य तिसऱ्या लाटेत राज्याला दररोज सुमारे 4 हजार मेट्रिक टन ऑक्सिजन आवश्यकता भासेल. आम्ही 2 हजार मेट्रिक टन उत्पादन करू शकतो. उर्वरित 2 हजार मेट्रिक टन ऑक्सिजन नजीकच्या राज्यातून महाराष्ट्राला मिळावे, यासाठी केंद्राने सहाय्य करावे, अशी विनंतीही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना केली.

    कोरोनाची तिसरी लाट थोपविण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी 6 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना ‘4 टी’चा मंत्र दिला. आपल्याला पुन्हा एकदा टेस्ट, ट्रॅक, ट्रीट आणि टीका या ‘चार टी’ रणनीतीवर पुढे जावे लागेल, असे पंतप्रधान म्हणाले. देशात कोरोनाचे एकूण रुग्णांपैकी 80 टक्के रुग्ण आणि मृत्यू हे केवळ महाराष्ट्र, तमिळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटक, केरळ, ओडिशा या 6 राज्यात झाले आहेत. त्यामुळे तातडीने योग्य ती पावले उचलणे आवश्यक आहे. सर्व मुलांचे संरक्षण व्हायला हवे. राज्यांतील रुग्णालयात असलेल्या खाटांची संख्या वाढवावी लागणार आहे आणि आरोग्य यंत्रणांनी याकडे लक्ष देणे आवश्यक आहे, अशी सूचनाही पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना केली.