‘पोषण माहमध्ये निरंतर प्रयत्नांद्वारे कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा’ – मंत्री यशोमती ठाकूर

शून्य ते 6 वर्ष वयोगटातील बालके असलेल्या स्थलांतर करणाऱ्या कुटुंबांवर लक्ष ठेवायचे असून त्यामधील लहान बालकांना स्थलांतराच्या नवीन ठिकाणी पूरक पोषण आहार सुलभतेने मिळेल या बाबीची खात्री करावी लागेल. असं देखील मंत्री यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे.

    मुंबई : कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा. परंतु, केवळ पोषण महिन्याच्या स्पर्धेपुरतेच नव्हे तर वर्षभर काम करत कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले. राष्ट्रीय पोषण महिन्याचा राज्यातील शुभारंभ दूरदृश्य प्रणालीद्वारे ॲड. ठाकूर यांच्या हस्ते झाला. यावेळी त्यांनी असं म्हटलं आहे.

    मंत्री ठाकूर म्हणाल्या की, “पोषण महिन्यामध्ये अंगणवाडी पर्यवेक्षिका, सेविका, मदतनीस यांना महत्त्वाची भूमिका बजावायची आहे. त्यासाठी ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधी ज्यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समित्यांचे पदाधिकारी, स्थानिक सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आदी लोकांमध्ये काम करणाऱ्यांना सहभागी करुन घ्यावे. कोविडचे नियम पाळून जास्तीत जास्त नाविण्यपूर्ण उपक्रम राबवून आणि लोकसहभाग वाढवून पोषण माहमध्ये देशात पहिला क्रमांक मिळवावा.”

    शून्य ते 6 वर्ष वयोगटातील बालके असलेल्या स्थलांतर करणाऱ्या कुटुंबांवर लक्ष ठेवायचे असून त्यामधील लहान बालकांना स्थलांतराच्या नवीन ठिकाणी पूरक पोषण आहार सुलभतेने मिळेल या बाबीची खात्री करावी लागेल. स्थलांतरित लाभार्थ्यांसाठीचे (मायग्रेशन सॉफ्टवेअर) उपयुक्त ठरेल. असं मंत्री यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे.