काँग्रेसला खुश करण्यासाठी घेतला दारूबंदी उठवण्याचा निर्णय; भाजप नेत्यांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

बढतीतील आरक्षणाच्या मुद्द्यावरून लक्ष हटवण्यासाठी ठाकरे सरकारने काँग्रेसला दारुबंदी हटवण्याचे गिफ्ट दिले आहे. जिल्ह्याची दारुबंदी उठविताना सरकारने अजब तर्क दिला आहे. वर्धा-गडचिरोली जिल्ह्यातही हीच तस्करीची स्थिती आहे. शेतकरी वीज बिल माफ करा या मागणीऐवजी परमिट रूमवाल्यांना सूट द्या असे म्हणणाऱ्यांकडून यापेक्षा जास्त अपेक्षा नव्हती असा टोला भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला

  मुंबई: चंद्रपूर जिल्ह्यातील शेकडो गावांनी दारूबंदी कायम ठेवण्याच्या मागणीसाठी केलेल्या आंदोलनाला न जुमानता महाविकास आघाडी सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत चंद्रपूरमधील दारूबंदी उठवण्याचा मोठा निर्णय घेतला. काँग्रेस नेते आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मागील काही काळापासून चंद्रपूरमधील दारुबंदी हटवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले होते. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे़ मात्र अवैध दारूविक्री व गुन्हेगारीतील वाढ रोखण्यासाठी हा निर्णय घेत असल्याचे कारण दारुबंदी उठविण्याच्या निर्णयाचे समर्थन करताना सरकारने दिले आहे़

  समितीला अडीच हजार निवेदने

  दारूबंदीनंतर चंद्रपूर जिल्ह्यात अवैध दारू विकली जात होती. दारूबंदी उठवावी अशी मागणी करणारी अडीच हजार निवेदने आली होती. अवैध आणि डुप्लिकेट दारूचे दुष्परिणाम दिसू लागले होते. यासंदर्भात देवतळे समिती तयार करण्यात आली होती. त्या समितीने दारूबंदी उठवावी, असा अहवाल दिला होता. तो अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत ठेवला होता, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.

  दुर्दैवी निर्णय

  दारूबंदी उठविण्याचा निर्णय दुर्दैवी असून त्याचे दूरगामी परिणाम होतील. कोरोनाचे संकट कायम असतानाच आरोग्य व्यवस्थेवर लक्ष देण्याऐवजी महाविकास आघाडी सरकार कोणत्या बाबींना प्राधान्य देते हेच यातून स्पष्ट झाले असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.

  ठाकरे सरकारचे काँग्रेसला गिफ्ट

  बढतीतील आरक्षणाच्या मुद्द्यावरून लक्ष हटवण्यासाठी ठाकरे सरकारने काँग्रेसला दारुबंदी हटवण्याचे गिफ्ट दिले आहे. जिल्ह्याची दारुबंदी उठविताना सरकारने अजब तर्क दिला आहे. वर्धा-गडचिरोली जिल्ह्यातही हीच तस्करीची स्थिती आहे. शेतकरी वीज बिल माफ करा या मागणीऐवजी परमिट रूमवाल्यांना सूट द्या असे म्हणणाऱ्यांकडून यापेक्षा जास्त अपेक्षा नव्हती असा टोला भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला.