निम्या राज्यात कोरोना रूग्णसंख्येत निर्बंध असूनही वाढ; रूग्णांना गृह विलगीकरणात न ठेवण्याचा महसूल मंत्र्याच्या आढावा बैठकीत निर्णय

करोनाचा प्रभाव कमी होत आहे की वाढत आहे याचा आढावा घेताना धक्कादायक बाब समोर आली आहे. हा वाढता धोका कमी करण्यासाठी या पुढच्या काळात गृह विलगीकरणात (होम आयसोलेशन) रुग्णांना न ठेवता त्यांना रूग्णालयात अथवा कोविड केंद्रात दाखल करून उपचार करण्याचा निर्णय घेण्यात आला.  

  मुंबई  : कोरोनाच्या दुस-या लाटेमध्ये महाराष्ट्राच्या ग्रामिण भागात मोठ्या प्रमाणात रूग्णांची संख्या पहायला मिळाली. त्यानंतर आज महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी जिल्हाधिका-यांशी आढावा बैठकीत संवाद साधला असता निम्या राज्यात म्हणजे १५ जिल्हयात कोरोना रूग्णांची संख्या निर्बंध असूनही अद्यापही कमी होण्याचे नाव घेताना दिसत नाही. त्यामुळे या जिल्ह्यात रूग्णांना गृह विलगीकरणात न ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

  १५ जिल्ह्यात कोरोनाची संख्या वाढती

  मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी काल कोकण दौ-यावर १ जून पासून राज्यात निर्बंध शिथील करण्याबाबत मौन राहणेच पंसत केले. याबाबत बैठकीत आढावा घेतल्यानंतर निर्णय घेण्यात येईल असे त्यांनी सांगितले होते. आज झालेल्या बैठकीत राज्यातील कोल्हापूर, सांगली, सातारा, यवतमाळ, अमरावती, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, अकोला, बुलढाणा, वाशीम, बीड, गडचिरोली, अहमदनगर, उस्मानाबाद. या १५ जिल्ह्यात कोरोनाची संख्या कमी होत नसल्याचे दिसून आले आहे.

  मोठ्या महानगरात रूग्णसंख्या घटली

  दुसरीकडे मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर या शहरांमध्ये करोनाचा धोका जरी कमी झाला असल्याचेही दिसून आले आहे. तरी राज्यातील ग्रामिण भागातील १५ जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या अद्यापही वाढत आहेत. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये होम आयसोलेशन गृह विलगीकरण बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी यासंबंधी माहिती दिली आहे. या जिल्ह्यांमधील करोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्ह्याधिकाऱ्यां सोबत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज व्हिडिओ कॉन्फरंन्सिंगद्वारे बैठक घेतली.

  ग्रामिण भागात धोका कायम

  करोनाचा प्रभाव कमी होत आहे की वाढत आहे याचा आढावा घेताना धक्कादायक बाब समोर आली आहे. हा वाढता धोका कमी करण्यासाठी या पुढच्या काळात गृह विलगीकरणात (होम आयसोलेशन) रुग्णांना न ठेवता त्यांना रूग्णालयात अथवा कोविड केंद्रात दाखल करून उपचार करण्याचा निर्णय घेण्यात आला.

  तिसऱ्या लाटेच्या आरोग्य सुविधांवर भर

  महसूलमंत्री थोरात म्हणाले की, करोनाच्या दुसऱ्या लाटेत आपल्याला ऑक्सिजन मिळविण्यासाठी प्रयत्न करावे लागले. त्यामुळेच अशा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांना चालना देण्याचे आणि प्रोत्साहन देण्याचे धोरण आता राज्य शासनाने ठरविले आहे. सध्याच्या परिस्थितीत ऑक्सिजनसाठी इतरांवर अवलंबून राहणे परवडणारे नाही. त्यामुळे राज्यासाठी आवश्यक तीन हजार टन ऑक्सिजन निर्मिती राज्यातच व्हावी, यासाठी ठिकठिकाणी प्रकल्प उभारणी करण्यास परवानगी देण्यात आली आहे, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी करोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविल्याने त्यासाठी आवश्यक आरोग्य सुविधांवर भर देण्याकडे लक्ष देण्याचे आदेश दिले आहेत.