वरवरा राव यांच्या वैद्यकीय जामीन अर्जावर उद्या निर्णय; न्यायालय राखून ठेवलेला निकाल करणार जाहीर

एल्गार परिषदेतील प्रक्षोभक भाषणांमुळे हा हिंसाचार उसळल्याचा तसेच एल्गार परिषदेला माओवाद्यांकडून अर्थपुरवठा झाला आणि अनेक सामाजिक कार्यकर्ते व विचारवंतांचा माओवाद्यांशी संबंध आहे, असा आरोप करत पोलिसांनी अनेक विचारवंत आणि लेखक, कवी, नागरी हक्क कार्यकर्ते यांना अटक केली.

    मुंबई: एल्गार परिषद आणि भीमा-कोरेगाव हिंसाचाराप्रकऱणी कारागृहात असलेल्या ८२ वर्षीय आरोपी आणि ज्येष्ठ तेलगु कवी वरवरा राव यांच्या वैद्यकीय जामीन अर्जावरील मुंबई उच्च न्यायालय आपला राखून ठेवलेला निकाल उद्या (सोमवारी) जाहीर करणार आहे.

    ३१ डिसेंबर २०१७ रोजी पुण्यातील शनिवार वाड्याजवळ एल्गार परिषद पार पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी १ जानेवारी, २०१८ रोजी पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथे हिंसाचार उसळला होता. एल्गार परिषदेतील प्रक्षोभक भाषणांमुळे हा हिंसाचार उसळल्याचा तसेच एल्गार परिषदेला माओवाद्यांकडून अर्थपुरवठा झाला आणि अनेक सामाजिक कार्यकर्ते व विचारवंतांचा माओवाद्यांशी संबंध आहे, असा आरोप करत पोलिसांनी अनेक विचारवंत आणि लेखक, कवी, नागरी हक्क कार्यकर्ते यांना अटक केली. त्यात प्रसिद्ध कवी वरवरा राव यांचाही समावेश होता. तेव्हापासून राव हे तळोजा मध्यवर्ती कारागृहात आहेत.

    मात्र, तळोजा कारागृहात राव यांची प्रकृती खालावली आणि त्यांच्या वैद्यकीय उपचारासाठी पत्नी हेमलता यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तळोजा तुरुंगात योग्य काळजी घेतली जात नसल्याने राव यांची प्रकृती गंभीर बनली आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा नानावटी रुग्णालयात हलवण्याचे निर्देश द्यावेत आणि त्यांची जामिनावर मुक्तता करावी’, अशी याचिका पत्नी हेमलता यांनी ॲड. इंदिरा जयसिंग यांच्यामार्फत केली होती. त्या याचिकेवर न्या. एस.एस. शिंदे आणि न्या. मनिष पितळे यांच्या खंडपीठासमोर जवळजवळ तीन महिन्यांपासून सुनावणी सुरू होती.

    दुसरीकडे, राव यांना सध्या पुरविण्यात येणाऱ्या वैद्यकीय सुविधा या तळोजा कारागृहात उपलब्ध नसल्यामुळे त्यांना जे.जे रुग्णालयातच ठेवण्यात यावे अशी विनंती राज्य सरकारच्यावतीने ॲड. दीपक ठाकरे यांनी केली. तेव्हा, सर्व पक्षकारांचा युक्तिवाद ऐकून घेत खंडपीठाने आपला निकाल राखून ठेवला होता जो सोमवारी जाहीर करणार आहे.

    राव यांचा युक्तिवाद

    राव यांना ज्या गुन्हासाठी अटक करण्यात आली तो गुन्हा गंभीर नाही. वर्षभरातील ३६५ दिवसांपैकी १४९ दिवस त्यांनी रुग्णालयात घालवले आहेत. राव आताही नानावटी रुग्णालयात असून तेथे त्यांच्यावर विविध आजारांवर उपचार सुरू असल्याचेही जयसिंग यांनी निदर्शनास आणून दिले होते.