Decision to close the first Jumbo Covid Covid Center in Mumbai

महालक्ष्मी कोविड केंद्राचे संचालक डॉ. कुमार डुसा यांनी सांगीतले की, रुग्णांची संख्या कमी झाल्याने महालक्ष्मी येथील कोविड केंद्र बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून हे जम्बो कोविड केंद्र मुंबईतील पहिले जम्बो कोविड केंद्र आहे.

मुंबई : मार्च ते सष्टेंबर या महिन्यात करोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच होती. अशा परिस्थितीत पालिका रुग्णालये कमी पडून रुग्णांना कोणतीही अडचण येवू नयेत यासाठी मुंबई शहर व उपनगरात अनेक ठिकाणी जम्बो कोविड केंद्र उभारण्यात आली. मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्येत काहीशी घट होत असल्याचे सकारात्मक चित्र दिसून येत आहे.

यामुळे सध्या शहर व उपनगरातील कोविड केंद्र बंद करण्याचा निर्णय आरोग्य विभाग घेत आहे. याच पार्श्वभूमीवर, महालक्ष्मी येथील जम्बो कोविड केंद्र देखील बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जुलै महिन्यात उभारलेल्या या केंद्रात मागील काही दिवसांपासून खूपच तुरळक रुग्ण दाखल होत असल्याने हे केंद्र बंद करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

वरळी, प्रभादेवी, जिजामाता नगर, आदर्श नगर या परिसरात मागील काही महिन्यांपासून कोविडचे दिवसाकाठी १०० ते २०० च्या आसपास रुग्ण सापडत होते. दिवसेंदिवस वाढत असलेले रुग्ण पाहता पालिका प्रशासनाने ९०० खाटांचे सुसज्ज कोविड केंद्र जुलै महिन्यात उभारले.

नोव्हेंबरपासून या कोविड केंद्रात तुरळक रुग्ण उपचारासाठी येत असल्याने खाटा काढून टाकण्यात आल्या असून केवळ ऑक्सिजनच्या खाटा आरक्षित ठेवण्यात आल्या असल्याचे आरोग्य विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

दरम्यान, महालक्ष्मी कोविड केंद्र हे सीएसआर फंडातून उभारण्यात आले होते. या केंद्राला चालवण्यासाठी दिवसाला किमान लाखभराचा खर्च येतो. शहरातील मुंबईतील सक्रिय रुग्णांची कमी झालेली संख्या लक्षात घेता अनेक स्थानिक पातळीवरील अधिकाऱ्यांनी कोविड केंद्रे बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. तसेच हे केंद्र सौम्य लक्षणे व लक्षण विरहीत असलेल्या रुग्णांसाठी उभारण्यात आले होते.

मात्र, एनएससीआय व वरळी पोद्दार कॉलेजमध्ये १००० खाटांची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. केवळ ऑक्सीजन बेड या केंद्रात राखीव ठेवण्यात आले आहेत. तसेच गरज पडल्यास पुन्हा ७०० बेडची सुविधा सुरु केली जाईल, पण सध्याची रुग्णसंख्या पाहता, एवढ्या मोठ्या कोविड केअर केंद्राची गरज लागेल अशी शक्यता नसल्याचे पालिका अधिकारी सांगतात.

याबाबत महालक्ष्मी कोविड केंद्राचे संचालक डॉ. कुमार डुसा यांनी सांगीतले की, रुग्णांची संख्या कमी झाल्याने महालक्ष्मी येथील कोविड केंद्र बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून हे जम्बो कोविड केंद्र मुंबईतील पहिले जम्बो कोविड केंद्र आहे.