तीन हॉस्पिटलने नाकारल्याने घरीच झाली प्रसुती, स्थानिक डॉक्टराने घरी जाऊन केले उपचार

मुंबई :निसर्ग वादळामुळे आरोग्य यंत्रणेबरोबर इतरही यंत्रणेचे तीन तेरा वाजवल्याचे समोर आले आहे. या वादळात मुंबईत घडलेल्या एका धक्कादायक घटनेत आरोग्य विभागाचा नाकर्तेपणा समोर आला आहे. अंधेरीतील चांदिवली

मुंबई :निसर्ग वादळामुळे आरोग्य यंत्रणेबरोबर इतरही यंत्रणेचे तीन तेरा वाजवल्याचे समोर आले आहे. या वादळात मुंबईत घडलेल्या एका धक्कादायक घटनेत आरोग्य विभागाचा नाकर्तेपणा समोर आला आहे. अंधेरीतील चांदिवली येथील पूजा भिसे यांना प्रसुतीसाठी पालिकेच्या घाटकोपर येथील मुक्ताबाई हॉस्पिटल, राजावाडी हॉस्पिटल त्यानंतर एका खासगी हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतरही डॉक्टरांनी दाखल करून घेण्यास नकार दिला. परंतु वादळामुळे अखेर तिला घरी नेण्यात आले असता तेथेच तिची प्रसुती झाली. पण यावेळी स्थानिक डॉक्टर देवाच्या रुपाने धावून आल्याने या महिलेला वेळेवर उपचार होऊ शकले असले तरी तिची प्रसुती घरातच झाली.

चांदिवली येथील संघर्ष नगरमध्ये राहणारी पूजा भिसे हिच्यावर घाटकोपरमधील मुक्ताबाई हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. ३ जूनला तिला पोटात दुखायला लागल्याने तिचे पती दत्तात्रय भिसे यांनी तिला मुक्ताबाई हॉस्पिटलमध्ये सकाळी १० वाजताच्या सुमारास नेले. डॉक्टरांनी तिच्या विविध तपासण्या करून तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेतले. परंतु त्यानंतर तिला अचानक ताप सुरू झाल्याने डॉक्टरांनी कस्तुरबा हॉस्पिटलला जाऊन कोविड चाचणी करूनच हॉस्पिटलमध्ये येण्यास सांगितले. मात्र बाहेर वादळाची परिस्थिती असल्याने कस्तुरबा हॉस्पिटलला जाणे शक्य नसल्याने दत्तात्रय भिसे आपल्या पत्नीला घेऊन राजावाडी हॉस्पिटलमध्ये गेले. परंतु वादळामुळे तेथेही कोरोना चाचणी केंद्र बंद ठेवण्यात आल्याने त्यांना चाचणी करण्यास नकार देण्यात आला. 
यादरम्यान पूजाच्या पोटात अधिकच दुखायला लागले होते. वादळाच्या परिस्थितीमध्ये कस्तुरबा हॉस्पिटलला पोहचेपर्यंत काही विपरित घडल्यास अवघड परिस्थिती निर्माण होऊ शकते. या भितीपोटी दत्तात्रय यांनी तिला जवळील एका खासगी हॉस्पिटलमध्ये नेले. परंतु मुक्ताबाई हॉस्पिटलच्या केसपेपरवर कोविड चाचणी लिहिलेले असल्याने त्यांनीही दाखल करून घेण्यास नकार दिला. दत्तात्रय भिसे यांनी डॉक्टरांच्या हातापाया पडल्यानंतर त्यांनी पूजाला दाखल करून घेण्याची तयारी दर्शवली मात्र त्याला एक लाख २० हजार तातडीने भरण्यास सांगितले. परंतु इमारतीच्या बांधकामावर काम करणार दत्तात्रय यांच्याकडे इतके पैसे नसल्याने त्यांनी डॉक्टरांना पैसे कमी करण्याची विनंती केली.
 
तसेच त्यांनी आपण ६० हजार रुपये भरू शकतो, असे त्यांनी डॉक्टरांना सांगितले. यावर डॉक्टरांनी त्यांनी तातडीने ५० हजार रुपये डिपॉझिट भरण्यास सांगितले. परंतु आपल्याकडे आता इतके पैसे नसून मला थोडी मुदत द्या अशी विनवणी दत्तात्रय याच्याकडून करण्यात आली. परंतु डॉक्टरांनी पैसे भरल्याशिवाय पूजावर उपचार करण्यास नकार दिल्याने अखेर दत्तात्रय आपल्या पत्नीला सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घरी घेऊन आला. तोपर्यंत तिच्या प्रसुती कळा वाढून, तिचे बाळ बाहेर येण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे घाबरलेल्या दत्तात्रय याने आपली आई, चुलती, बहिणी व शेजारच्या काही महिलांना बोलवत परिसरातील स्थानिक डॉक्टर रवींद्र म्हस्के यांना दूरध्वनी केला.
 
 डॉ. म्हस्के यांनीही घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तातडीने निवारा संस्थेच्या रुग्णवाहिकेला दूरध्वनी करत संघर्ष नगरमधील इमारत क्रमांक २३ मधील दत्तात्रय भिसे यांच्या घरी धाव घेतली. मात्र ते घरी पोहचले त्यावेळी बाळ बर्‍यापैकी बाहेेर आले होते. त्यामुळे डॉक्टर म्हस्के यांनी तातडीने आपल्या सहाय्यक कर्मचार्‍यांना बोलवून पूजाची घरच्या घरीच प्रसुती केली. पूजाने एका गोंडस बालिकेला जन्म दिला असून, डॉ. रवींद्र म्हस्के वेळेवर पोहचल्याने पूजाला वेळेवर उपचार मिळू शकल्याने भिसे कुटुंबाकडून डॉक्टरांचे आभार मानले. लॉकडाऊनमुळे दत्तात्रय यांचा रोजगार बंद झाल्याने सध्या त्यांची आर्थिक परिस्थिती हालाखीची आहे. ही बाब डॉ. रवींद्र म्हस्के यांच्या लक्षात आल्यानंतर पूजावर करण्यात आलेल्या उपचारासाठी त्यांनी एकही रुपया घेतला नाही. तसेच त्यांनी भिसे यांना राशनही भरून दिले. त्यामुळे डॉक्टराच्या रुपात देवच सापडला असल्याची भावना दत्तात्रय भिसे यांनी व्यक्त केली.
 
दत्तात्रय भिसे यांचा दूरध्वनी आल्यानंतर मी तातडीने त्यांच्या घरी धाव घेतली. परंतु त्यांच्या घरी गेल्यावर बाळ अर्धे बाहेर आल्याचे मला दिसले. त्यामुळे पूजाला हॉस्पिटलला न नेता तिची घरीच प्रसुती करण्याचा निर्णय घेतला. ग्रामीण भागामध्ये अनेक महिलांची प्रसुती घरी होत असली तरी मुंबईसारख्या शहरात अशी वेळ येणे हे फारच खेदजनक आहे. – डॉ. रवींद्र म्हस्के, संघर्ष नगरमधील डॉक्टर
 
जोरदार पाऊस व वादळाच्या परिस्थितीमध्ये हॉस्पिटलने पत्नीला दाखल करून घेण्यास नकार दिला होता. त्यातच पत्नीला प्रसुती कळा सुरू होऊन बाळ बाहेर येण्यास सुरुवात झाल्याने मी प्रचंड घाबरलो होतो. परंतु डॉ. रवींद्र म्हस्के हे देवाच्या रुपाने धावून आले. त्यांनी माझ्या पत्नीची प्रसुती मोफत करत आम्हाला राशनही दिले. – दत्तात्रय भिसे