
शरद पवारांना भेटण्यापूर्वी धनंजय मुंडे यांनी मंत्रालयात उपमुख्ममंत्री अजित पवार आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली. त्यामुळे या भेटीबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.
मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर रेणु शर्मा नावाच्या महिलेने बलात्काराचा आरोप करत ओशिवरा पोलीस ठाण्यात (Oshiwara Police Station) तक्रार दाखल केली. मात्र, रेणु यांची बहिण असलेल्या करुणासोबत परस्पर सहमतीने संबंध असून यातून दोन मुलं असल्याची कबुली धनंजय मुंडेंनी दिली. यानंतर भाजपकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad pawar) यांची बुधवारी सिल्वर ओकवर जाऊन भेट घेतली आहे. यावेळी पवार आणि धनंजय मुंडे यांच्यात बराच वेळ चर्चा झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली.
शरद पवारांना भेटण्यापूर्वी धनंजय मुंडे यांनी मंत्रालयात उपमुख्ममंत्री अजित पवार आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली. त्यामुळे या भेटीबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दोन पत्नी असल्याचं कबूल केलं आहे. हिंदू धर्मात दोन पत्नी चालत नाहीत आणि त्याला न्यायही नाही. धनंजय मुंडे यांनी राजीनामा न दिल्यास आम्ही रस्त्यावर उतरु, असा इशारा भाजप महिला मोर्चाच्या उमा खापरे यांनी दिला आहे. तर भाजपच्या अनेक नेत्यांकडून राजीनाम्याची मागणी होत आहे.
शरद पवार यांचा शब्द हा फक्त राष्ट्रवादीतच नव्हे तर आता महाविकास आघाडीतही पवारांच्या निर्णयावर सर्व काही अवलंबुन आहे. जर, शरद पवारांनी कडक भूमिका घेतली तर धनंजय मुंडेंचं मंत्रिपद मुख्यमंत्रीही वाचवू शकणार नाहीत. धनंजय मुंडेंना मंत्रीपद सोडावे लागू शकते. निर्णय झालाच, तर चौकशीलाही सामारो जावं लागेल.