राष्ट्रीय मिल मजदूर संघाची केंद्राकडे मागणी; मुंबईतील सर्व खासदारांचे पाठपुरावा करण्याचे आश्वासन 

मुंबईतील टाटा, पोदार, इंडिया युनायटेड मिल क्र.५, दिग्विजय, तर बारशी येथील बारशी टेक्स्टाईल, अचलपूरची फिन्ले या गिरण्या २३ मार्च २०२० या पहिल्या लॉकडाऊनपासून आतापर्यंत एक वर्षापेक्षा अधिक काळ बंद आहेत. या गिरण्यांतील कामगार आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या जवळपास १० हजार लोकांची उपासमार सुरू आहे. या गिरण्या असलेल्या मुंबईसह बार्शी, अचलपूर या ठिकाणी राज्य सरकारकडून अनलॉक सुरू होत आहे, तेव्हा या गिरण्या सुरू करण्यात याव्यात, अशी लेखी निवेदनात मागणी करण्यात आली आहे.

    मुंबई : मुंबईसह राज्यातील बंद असलेल्या गिरण्या केंद्र सरकारने चालवून कामगारांची उपासमार संपुष्टात आणावी, अशी मागणी केंद्र सरकाच्या कानावर घालून, मार्गी लावण्यासाठी राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या शिष्टमंडळानेे मुबईतील सर्व खासदारांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. भेटलेल्या सर्वच खासदारांनी या प्रश्नाचा ताबडतोबीने पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे.

    संघटनेचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री सचिनभाऊ अहिर यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत या प्रश्नावर वरीलप्रमाणे तांतडीने प्रयत्न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी या प्रश्नी प्रयत्न कमी पडू देणार नाही, असे सांगितले होते.

    मुंबईतील टाटा, पोदार, इंडिया युनायटेड मिल क्र.५, दिग्विजय, तर बारशी येथील बारशी टेक्स्टाईल, अचलपूरची फिन्ले या गिरण्या २३ मार्च २०२० या पहिल्या लॉकडाऊनपासून आतापर्यंत एक वर्षापेक्षा अधिक काळ बंद आहेत. या गिरण्यांतील कामगार आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या जवळपास १० हजार लोकांची उपासमार सुरू आहे. या गिरण्या असलेल्या मुंबईसह बार्शी, अचलपूर या ठिकाणी राज्य सरकारकडून अनलॉक सुरू होत आहे, तेव्हा या गिरण्या सुरू करण्यात याव्यात, अशी लेखी निवेदनात मागणी करण्यात आली आहे.

    मुंबईतील बंद गिरण्याच्या जमिनी विकून आलेला निधी या गिरण्या पूर्ववत चालविण्यासाठी उपलब्ध करुन द्यावा, अशीही निवेदनात मागणी करण्यात आली आहे. संघाचे खजिनदार निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष अण्णा शिर्सेकर, सेक्रेटरी शिवाजी काळे, कार्यलयीन अधिक्षक मधुकर घाडी या शिष्टमंडळाने खासदार अरविंद सावंत तसेच गजानन किर्तीकर,राहूल शेवाळे, गोपाळ शेट्टी, या खाजदारांसह आज राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांची मुंबईत प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन दिले. उपनगरातील खासदार मनोज कोटक यांची महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे उपाध्यक्ष उत्तम गिते यांनी भेट घेऊन निवेदन दिले.

    हे सुद्धा वाचा