मुंबईत डेंग्यूचे रुग्ण वाढतायेत…

जुलै महिन्यापेक्षा ऑगस्ट महिन्यात डेंग्यूचे रुग्ण चारपटीने वाढले आहेत. जुलै महिन्यात डेंग्यूचे २८ रुग्ण होते, तर ऑगस्ट महिन्यात १३२ डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. डेंग्यूसोबतच मलेरियाचे रुग्ण देखील वाढत आहेत. मलेरियाचे ऑगस्टमध्ये एकूण ७९० रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाने या साथींच्या रोगावर कसा आळा घालता येईल यासाठी कंबर कसली आहे.

    मुंबई : एकिकडे कोरोनावर नियंत्रण मिळवत असताना, आणि कोरोनाची तिसरी लाट येण्यापूर्वी मुंबईत साथीच्या रोगाने थैमान घातले आहेत. मुंबईत डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे चित्र पाहयला मिळत आहे. जुलै महिन्यापेक्षा ऑगस्ट महिन्यात डेंग्यूचे रुग्ण चारपटीने वाढले आहेत. जुलै महिन्यात डेंग्यूचे २८ रुग्ण होते, तर ऑगस्ट महिन्यात १३२ डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. डेंग्यूसोबतच मलेरियाचे रुग्ण देखील वाढत आहेत. मलेरियाचे ऑगस्टमध्ये एकूण ७९० रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाने या साथींच्या रोगावर कसा आळा घालता येईल यासाठी कंबर कसली आहे.

    तिसरी लाट येण्यापूर्वी राज्यात आणि मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहे. पालिका कोरोना नियत्रंणात ठेवण्यासाठी प्रयत्न करत असताना, आणि कोरोना लसीकरण वाढवत असताना सुद्धा कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यात भरीस भर म्हणून यंदाच्या पावसाळ्यातही साथीच्या आजारानी डोके वर काढले आहे. डेंग्यू, मलेरिया आणि गेस्ट्रोचे रुग्ण सध्या आढळत आहेत. जुलै महिन्यात डेंग्यूचे केवळ २८ रुग्ण होते, मात्र महिनाभरात ही संख्या वाढून १३२ वर पोहोचली आहे, तर जुलै महिन्यात मलेरियाचे रुग्ण ७८७ होते, तर ऑगस्टमध्ये हे रुग्ण ७९० झाले आहेत. यामुळे पालिका प्रशासन अधिक सतर्क झाले असून डेंग्यूवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करताहेत.

    जुलैच्या महिन्याच्या तुलनेत ऑगस्टमध्ये डेंग्यूचे रुग्ण चारपटीने वाढल्यामुळे पालिकेची डोकेदुखी वाढली आहे. साधारण पाऊस कमी झाला की, ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये डेंग्यूचे रुग्ण वाढायला सुरुवात होते. त्यामुळे आता मुंबई महापालिकेसमोर साथीच्या आजारांचे नवीन आव्हान असणार आहे. घरात आणि आजूबाजूच्या परिसरात मलेरिया आणि डेंग्यूचे डास होऊ नये, यासाठी नागरिकांनी जागरूक राहून योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. तसेच थंडी, ताप, डोकेदुखी असे आजार जाणवल्यास त्वरित डॉक्टरकडून उपचार घ्या किंवा जवळच्या आरोग्य विभागातील दवाखान्यात दाखवा. परिसरात पाणी साचल्याने डासांची निर्मिती होते, आणि त्या डासांमुळे डेंग्यू होतो, म्हणून परिसरात पाणी साचू न देणे, स्वच्छता राखणे आदी बाबींची काळजी घेतली पाहिजे असं पालिकेनं म्हटले आहे.