वंचित बहुजन आघाडी आणि रजा अकादमीतर्फे मुस्लिम आरक्षणाच्या प्रश्नावर पाच जुलैला मोर्चा : प्रकाश आंबेडकर

मराठा आरक्षण आणि ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा धगधगत असताना मुस्लिमांना ५ टक्के आरक्षण दयावे, या मागणीसाठी ५ जुलैला विधानभवनावर भव्य मोर्चा काढणार आहे.  ते म्हणाले की, राज्यात करोनाचे संकट आहे. करोनाच्या लाटांवर लाटा येऊ लागल्या आहेत. मात्र असे असले तरी आम्ही मोर्चा काढणारच, असा निर्धार आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे.

    मुंबई : मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात निर्णय झाला असला, तरी देखील मुस्लिमांच्या आरक्षणाबाबत कोणताही निर्णय झालेला नसतानाही धर्मनिरपेक्ष म्हणवून घेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेसने अजूनही मुस्लिम समाजाला आरक्षण दिले नाही. यासाठी येत्या ५ जुलैला विधानसभवनावर सरकारविरोधात भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. हा मोर्चा वंचित बहुजन आघाडी आणि रजा अकादमीतर्फे काढण्यात येत असल्याचेही आंबेडकर म्हणाले.

    कोरोना असला तरी मोर्चा काढणार

    ते म्हणाले की, मराठा आरक्षण आणि ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा धगधगत असताना मुस्लिमांना ५ टक्के आरक्षण दयावे, या मागणीसाठी ५ जुलैला विधानभवनावर भव्य मोर्चा काढणार आहे.  ते म्हणाले की, राज्यात करोनाचे संकट आहे. करोनाच्या लाटांवर लाटा येऊ लागल्या आहेत. मात्र असे असले तरी आम्ही मोर्चा काढणारच, असा निर्धार आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी सांगितले की मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण मान्य केले आहे. मात्र, आता सरकारने ते जाहीर करावे, अशी आमची प्रमुख मागणी आहे असे आंबेडकर म्हणाले.

    भाजपचे राजकारण लक्षात आले आहे

    प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी भारतीय जनता पक्षावरही टिका केली. भाजपचे राजकारण आता लोकांच्या लक्षात आले आहे. ते म्हणाले की, उत्तर प्रदेशात दंगल व्हावी यासाठी प्रयत्न केला जात आहे. हे लक्षात घेता दंगल भडकवणाऱ्या व्यक्तीविरोधात कायदा होणे गरजेचे असून दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करणाऱ्यांना कायद्यानुसार शिक्षा व्हायला पाहिजे, असे आंबेडकर पुढे म्हणाले. याबाबच महाराष्ट्र सरकारबरोबरच केंद्र सरकारनेही निर्णय घेतला पाहिजे, असे ते म्हणाले.