‘देशमुख व परमबीरपैकी एकाला ‘वर्षा’वर तर दुसऱ्याला ‘मातोश्री’वर लपवलेत; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

आघाडी सरकारमधील माजी मंत्री अनिल देशमुख कुठे आहेत? परमबीर सिंग कुठे आहे? एकाला वर्षावर लपवलंय तर दुसऱ्याला मातोश्रीत लपवलं आहे, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

    मुंबई : मनी लाँडरिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी अंमलबजावणी संचालनालयासमोर (ईडी) हजर न झाल्याबद्दल न्यायालयाने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध वॉरंट जारी केले आहे. अंमलबजावणी संचालनालयाने देशमुख यांच्याविरोधात मनी लाँड्रिंगप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ईडीच्याच्या सुनावणीदरम्यान देशमुखविरुद्ध कोर्टाने वॉरंट जारी केले. कोर्टाने देशमुख यांना १६ नोव्हेंबर या दिवशी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

    अनिल देशमुख यांच्यावर माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याकडून भ्रष्टाचाराचे आणि खंडणी वसुलीचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. ईडीनं देशमुख यांना आतापर्यंत पाचवेळा समन्स बजावले आहे. मात्र, अनिल देशमुख हे अद्याप एकदाही चौकशीसाठी हजर राहिलेले नाही. हे निदर्शनात आल्यानंतर ईडीनं देशमुख यांच्या विरोधात दंडाधिकारी न्यायालयात दावा दाखल केला आहे.

    सध्या परमबीर सिंह आणि अनिल देशमुख सध्या कोठे आहेत याबाबत माहिती नाही. त्यामुळे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. सोमय्या यांनी आज रविवारी पाचपाखाडी येथील केबीपी महाविद्यालयात आयोजित एका कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनिल देशमुख यांच्यावरही टीका केली.

    सोमय्या नेमकं काय म्हणाले?

    ‘कोर्टाने त्यांना हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. पण ते हजर होत नाही. आघाडी सरकारमधील माजी मंत्री अनिल देशमुख कुठे आहेत? परमबीर सिंग कुठे आहे? एकाला वर्षावर लपवलंय तर दुसऱ्याला मातोश्रीत लपवलं आहे, असा आरोपही त्यांनी केला. अनिल देशमुख जेव्हा तुरुंगात जातील तेव्हा सर्वांची झोप उडेल. जितेंद्र आव्हाड, प्रताप सरनाईक आणि अनिल परबही तुरुंगात जातील असा दावा त्यांनी केला. तसेच ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये ११ भ्रष्टाचारी नेते आहेत. त्यांच्या भ्रष्टाचाराची माहिती मला कुठून येते हे मी तुम्हाला का सांगू? मला शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसबाबतचीही माहिती मिळत असते. आता ११ ऐवजी २० मंत्र्यांची नावे लवकरच समोर येतील. मला अनेक ठिकाणाहून फोन येतात. उद्या कोण टार्गेट आहे असे विचारले जाते. कोणाचा भ्रष्टाचार बाहेर येणार असे विचारण्यात येते’, असे त्यांनी सांगितले.