देशमुख यांची दिवाळी तुरुंगातच ! मुश्रीफांवरही कारवाई होणार; किरीट सोमय्यांचा दावा

मला आणि माझ्या मुलालाही धमक्या मिळत आहेत. पण आम्ही या धमक्यांना घाबरत नाही. अलिबाबा आणि त्यांच्या चाळीस चोरांचा घोटाळा बाहेर काढणारच. आम्ही थांबणार नाही. मुख्यमंत्री ठाकरे आणि संजय राऊत हे स्टंटबाज आहेत. ते लक्ष डायव्हर्ट करण्याचे काम करत आहेत. उद्धव ठाकरेंनी नेमलेले मंत्री, पोलिस आयुक्त फरार झाले आहेत. हे सरकार सामान्य जनतेचे नव्हे तर घोटाळेबाजांचे नेतृत्व करत आहे, अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली.

    मुंबई : दिवाळीपर्यंत जनतेला वाट पाहावी लागणार नाही. दिवाळीपूर्वीच राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना तुरुंगात जावे लागेल. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारमधील परिवहन मंत्री अनिल परब यांचा नंबर लागेल. नंतर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावरही कारवाई होणार आहे, असा दावा भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला. मुश्रीफ यांची प्रकृती लवकर बरी व्हावी. सोमवारी मी कोल्हापूरला जाणार आहे. मुश्रीफ यांनी बेनामी साखर कारखाना उभारला हे मी कोल्हापूरकरांसमोर मांडणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

    परब यांनी सोमय्यांना नोटीस पाठवून माफी मागण्यास सांगितले होते. त्यावरही सोमय्यांनी प्रतिक्रिया दिली. परब यांची माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही. उलट त्यांनीच राज्यातील साडेबारा कोटी जनतेची माफी मागितली पाहिजे. राज्यात लॉकडाऊन असताना परब यांनी स्वत:चे रिसॉर्ट बांधण्यासाठी थ्री फेसच्या एमएसईबीचे कनेक्शन घेतले. लॉकडाऊन असताना परब बेकायदेशीरपणे रिसॉर्ट बांधत होते. याची त्यांना लाज वाटली पाहिजे, असे सोमय्या म्हणाले.

    मला आणि माझ्या मुलालाही धमक्या मिळत आहेत. पण आम्ही या धमक्यांना घाबरत नाही. अलिबाबा आणि त्यांच्या चाळीस चोरांचा घोटाळा बाहेर काढणारच. आम्ही थांबणार नाही. मुख्यमंत्री ठाकरे आणि संजय राऊत हे स्टंटबाज आहेत. ते लक्ष डायव्हर्ट करण्याचे काम करत आहेत. उद्धव ठाकरेंनी नेमलेले मंत्री, पोलिस आयुक्त फरार झाले आहेत. हे सरकार सामान्य जनतेचे नव्हे तर घोटाळेबाजांचे नेतृत्व करत आहे, अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली.

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही जनतेची माफी मागितली पाहिजे. त्यांनीही त्यांच्या पत्नीच्या नावे 19 बेनामी बंगले बांधले आहेत. त्यामुळे त्यांनी माफी मागायला हवी. इतरांसह मी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याही धमक्यांना घाबरत नाही. परब यांना आज ना उद्या कोर्टात जावेच लागणार आहे. परब हे जेलमधूनच कोर्टात जाऊ शकतात. सर्वांना कायदा समान आहे.

    - किरीट सोमय्या, भाजपा