धक्कादायक! भीमा-कोरेगाव हिंसचार प्रकरणी जामीन मिळूनही वरवरा राव यांची सुटका नाही

मुंबई उच्च न्यायालयाने राव यांची वैद्यकीय कारणास्तव विविध अटी आणि शर्तींसह ५० हजारांच्या वैयक्तिक जामिनावर केवळ सहा महिन्यांसाठी सुटका केली होती. त्यात ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यासह तेवढ्याच रकमेचे दोन हमीदार देण्याची अट खंडपीठाने आपल्या आदेशात दिली होती.

  • कागदपत्रांची पुर्तता न झाल्याने प्रक्रिया खोळंबली
  • रुग्णालयात राव यांची भेट घेण्यास वकिलांना परवानगी
  • दोन हमीदारांसदर्भात नव्याने अर्ज दाखल करण्याचे न्यायालयाचे निर्देश

मुंबई : एल्गार परिषद आणि भीमा-कोरेगाव हिंसाचाराप्रकरणी अटकेत असलेल्या ८२ वर्षीय आरोपी आणि ज्येष्ठ तेलुगू कवी वरवरा राव यांना जामीन मिळूनही कागदपत्रांच्या पूर्ततेअभावी सुटका खोळंबलेली असल्याचा माहिती मुंबई उच्च न्यायालयाला देण्यात आहे. त्याची दखल घेत खंडपीठाने राव यांच्या वकिलांना नानावटी रुग्णालयात जाऊन त्यांची जामीनासंदर्भातील कागदपत्रांवर तसेच नव्याने दाखल करण्यात येणाऱ्या दुरुस्ती अर्जावर सही घेण्यास परवानगी दिली.

मुंबई उच्च न्यायालयाने राव यांची वैद्यकीय कारणास्तव विविध अटी आणि शर्तींसह ५० हजारांच्या वैयक्तिक जामिनावर केवळ सहा महिन्यांसाठी सुटका केली होती. त्यात ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यासह तेवढ्याच रकमेचे दोन हमीदार देण्याची अट खंडपीठाने आपल्या आदेशात दिली होती. मात्र, सध्या करोनाच्या संकटामुळे मर्यादित स्वरूपात कामे होत आहेत. त्यामुळे दोन हमीदारांविषयीची प्रक्रिया पूर्ण करण्यात विलंब होत असून तूर्तास रोखीची बंधपत्रे जमा करून नंतर विशिष्ट कालावधीत हमीदार देण्याच्या अटीवर जामीन मंजूर करावा, अशी विनंती राव यांच्यावतीने ज्येष्ठ वकील आनंद ग्रोव्हर यांनी न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. मनिष पितळे यांच्या खंडपीठाकडे गुरुवारी केली.

त्यावर राष्ट्रीय तपास यंत्रणेच्यावतीने वकील संदेश पाटील यांनी आक्षेप घेतला आणि तपास यंत्रणेच्यावतीने उच्च न्यायालयाच्या जामीन आदेशाविरोधात केंद्रीय गृह मंत्रालयाला विशेष सुट्टी याचिका दाखल करता यावी, यासाठी सर्व कागदपत्र पाठविण्यात आल्याची माहिती खंडपीठाला दिली. त्यांची बाजू ऐकून घेत हमीदार देण्यासंदर्भात नव्याने अर्ज दाखल करावा असे न्यायालयाने राव यांच्या वकिलांना सांगितले. तेव्हा, नव्याने अर्ज दाखल करण्यासाठी राव यांची सही आवश्यक आहे.

मात्र, नानावटी रुग्णालय प्रशासन राव यांना भेटण्यास मनाई करत असल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी न्यायालयाला दिली. त्याची दखल घेत न्यायालयाने राव यांच्या वकिलांना नानावटी रुग्णालयात जाऊन भेटण्यास परवानगी देत हमीदार देण्यासंदर्भात नव्याने अर्ज शुक्रवारी न्यायालयात सादर करण्याचे निर्देश देत सुनावणी तहकूब केली.