लॉकडाऊन असूनही मुंबईतील ९० कुटंबीयांना मिळाले हक्काचे घर 

बोरिवली येथील एसआरए प्रकल्पातील नागरिकांना मोठा दिलासा

मुंबई : कोरोना संकट आणि लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेचं कंबरडे मोडलं आहे, यामध्ये पायाभूत सुविधांच्या कामावर मोठा परिणाम होणार आहे, त्यामुळे अनेक प्रकल्प पूर्ण व्हायला विलंब होणार आहे.

मार्च २०२० मध्ये लॉकडाउन झाल्यानंतर अनेक उद्योगधंदे बंद झाले अनेक नागरिकांच्या नोकऱ्या गेल्या. लॉकडाउनचा सर्वात मोठा फटका बांधकाम क्षेत्राला बसला असून मुंबईतील अनेक बांधकाम मजूर आपल्या घरी परत गेल्यामुळे अनेक ठिकाणी सुरु असलेली बांधकामे बंद पडली. आजमितीला मुंबईत अनेक एसआरए प्रकल्प सुरु असून या लॉकडाउनमुळे अनेक प्रकल्प रखडले आहेत व अनेकांना मासिक भाडे सुद्धा भेटत नाही, तसंच लॉकडाऊनमुळे पायाभूत सुविधा प्रकल्पाची काम करणारे काही कंत्राटदारही आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले आहेत.
परंतु बोरिवली पूर्व येथील राय डोंगरी येथील भाजीवाला चाळ, राधाबाई चाळ व सिध्दीविनायक चाळीतील ९० नागरिकांना ३०० स्केवर फुट घरांचा ताबा देण्यात आला. शिवोहंम समूह हा बांधकाम क्षेत्रातील एक नावाजलेले नाव असून या समूहाचे संचालक महेंद्र जैन यांनी उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांच्या उपस्थितीत नागरिकांना घराच्या चाव्या दिल्या.

मुंबईत सध्या पुनर्विकासाचे प्रकल्प मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. मात्र प्रकल्प सुरू होऊन अनेक वर्षे झाली तरी मोठ्या प्रमाणावर ग्राहकांना घराचा ताबा मिळालेला नाही तसेच कोरोनामुळे झालेल्या आर्थिक कोंडीमध्ये बोरिवलीतील या ९० कुटंबीयांना हक्काचे घर मिळाल्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे अशी माहिती खासदार गोपाळ शेट्टी यांनी दिली.अवघ्या चार वर्षात घराचा ताबा मिळाल्याबद्दल येथील रहिवाश्यांमधे आनंद व्यक्त केला जात आहे.