bmc

मुंबईतील काही मैदाने, उद्यानांच्या विकासासाठी प्रशासनाने अद्याप कंत्राटदार नियुक्त केले नसल्याने विकास लटकणार आहे. उद्याने, मैदानांच्या विकासाबाबतच्या निविदा प्रशासनाने नाकारल्या असून आता पुन्हा फेर निविदा काढल्या जाणार आहेत. मात्र या प्रक्रियेला आणखी चार महिन्यांचा कालावधी जाणार असल्याने उद्याने, मैदानांची दुर्दशा होणार आहे. त्यामुळे सध्याच्या निविदेवर तात्काळ विचार करून निर्णय घ्यावा, अशी सूचना स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रशासनाला केली आहे.

    मुंबई : मुंबईतील काही मैदाने, उद्यानांच्या विकासासाठी प्रशासनाने अद्याप कंत्राटदार नियुक्त केले नसल्याने विकास लटकणार आहे. उद्याने, मैदानांच्या विकासाबाबतच्या निविदा प्रशासनाने नाकारल्या असून आता पुन्हा फेर निविदा काढल्या जाणार आहेत. मात्र या प्रक्रियेला आणखी चार महिन्यांचा कालावधी जाणार असल्याने उद्याने, मैदानांची दुर्दशा होणार आहे. त्यामुळे सध्याच्या निविदेवर तात्काळ विचार करून निर्णय घ्यावा, अशी सूचना स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रशासनाला केली आहे.

    मुंबईतील उद्याने, मैदानांच्या विकासासाठी प्रशासनाने कंत्राटासाठी निविदा काढल्या होत्या. मात्र कंत्राटाच्या रकमेत तडजोड न झाल्याने याबाबतची निविदा प्रशासनाने नाकारली आहे. त्यामुळे याबाबत पुन्हा निविदा काढण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. स्थायी समितीत विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी यावर हरकतीचा मुद्दा मांडून फेर निविदा काढण्याच्या निर्णयाला विरोध केला. आधीच निविदा प्रक्रियेत चार महिने गेले आहेत. आता पुन्हा निविदा काढल्यास आणखी चार महिने जाणार आहे. त्यानंतर पालिका निवडणुका असल्याने आचारसंहितेत हा प्रस्ताव लटकून पडेल.

    मुंबईतील अनेक उद्याने, मैदानांची अवस्था दयनीय झाली आहे. त्यात या उद्याने, मैदानांची विकास कामे रखडल्याने त्यांची दुर्दशा होईल. त्यामुळे सध्याची निविदा न नाकारता कंत्राटाच्या रकमेत तडजोड करून विकास कामांना सुरुवात करावी अशी मागणी स्थायी समितीत सदस्यांनी केली. निविदेबाबत विचार करून संबंधित प्रस्ताव येत्या स्थायी समितीत आणावा असे आदेश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रशासनाला दिले आहेत.