कोरोनाचा धोका पूर्णपणे ओळखल्याशिवाय लढाई अपूर्ण राहील – देवेंद्र फडणवीस

मुंबई: कोरोनाचा धोका पूर्णत: ओळखल्याशिवाय कोरोनाविरोधातील लढाई अपूर्णच राहील. मुंबईत प्रतिदिन १० हजार चाचण्यांची क्षमता असताना केवळ चार ते साडेचार हजार चाचण्या केल्या जात आहेत आणि त्या

 मुंबई: कोरोनाचा धोका पूर्णत: ओळखल्याशिवाय कोरोनाविरोधातील लढाई अपूर्णच राहील. मुंबईत प्रतिदिन १० हजार चाचण्यांची क्षमता असताना केवळ चार ते साडेचार हजार चाचण्या केल्या जात आहेत आणि त्या पूर्वीच्या तुलनेत कमी झालेल्या आहेत, असे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी सांंगितले की, १८ मे 2020 रोजीपर्यंत एकूण झालेल्या चाचण्या आणि त्यातील किती रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले याची आकडेवारी पाहिली तर याची गरज प्रतिपादीत होते. संपूर्ण भारतात या तारखेपर्यंत एकूण चाचण्या २३,०२,७९२ इतक्या झाल्या आणि त्यात ९६,१६९ पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले. त्यामुळे एकूण चाचण्यांच्या संख्येत पॉझिटिव्ह येण्याची भारताची टक्केवारी ही ४.१७ टक्के इतकी आहे. तीच महाराष्ट्राची १२.४३ टक्के (एकूण चाचण्या : २,८२,०००/पॉझिटिव्ह रूग्ण : ३५,०५८) इतकी आहे. मुंबईत १३.१७ टक्के (एकूण चाचण्या : १,६२,०००/पॉझिटिव्ह रूग्ण : २१,३३५) इतकी आहे. याचाच अर्थ झालेल्या एकूण चाचण्यांमध्ये पॉझिटिव्ह येणार्‍या रूग्णांचे प्रमाण हे देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात तीनपट अधिक आहे आणि मुंबईत तर ते त्याहून अधिक आहे. अशात एकाच व्यक्तीच्या झालेल्या अनेक चाचण्यांची संख्या वजा केली तर मुंबईत पॉझिटिव्हीटीचे प्रमाण हे जवळजवळ २२ टक्के आहे. (एकाच व्यक्तीच्या दोन वा तीनदा चाचण्या केल्या जातात. रूग्णाला सुटी देण्यापूर्वी सलग दोन दिवस त्याची चाचणी निगेटिव्ह येणे आवश्यक आहे.) अशी परिस्थिती असताना मुंबईत चाचण्यांची संख्या कमी आहे. दहा हजाराची क्षमता असताना केवळ चार हजारांच्या आसपास त्या होत आहेत. हे संकट पूर्णत: ओळखल्याशिवाय आणि ते हाताळण्यास सज्ज झाल्याशिवाय ही लढाई पूर्ण होऊ शकणार नाही. महाराष्ट्रात अधिक चाचण्या होतात, असा केवळ दावा हा नागरिकांना कोरोनाच्या संकटापासून वाचवू शकणार नाही.