आमदार निलंबित करण्यासाठी सरकारकडून रचण्यात आली स्टोरी, पण सगळे आमदार सस्पेंड झाले तरीही ओबीसींसाठी लढा सुरुच राहणार – फडणवीस

आमचे आमदार निलंबित करण्यासाठीच सरकारच्या मंत्र्यांनी शिवीगाळ आणि धक्काबुक्कीची स्टोरी रचली, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis Reaction) यांनी केला आहे. 

    मुंबई: विरोधी पक्षाचं (Opposition party)संख्याबळ कमी व्हावं म्हणून आमच्या आमदारांना सस्पेंड करण्यात आलं आहे. आमचे आमदार निलंबित करण्यासाठीच सरकारच्या मंत्र्यांनी शिवीगाळ आणि धक्काबुक्कीची स्टोरी रचली, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis Reaction) यांनी केला आहे.

    बेशिस्त वर्तनाच्या कारणावरून भाजपच्या बारा आमदारांना निलंबित करण्यात आलं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.

    ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर आम्ही सरकारला उघडं पाडलं. सरकारमुळे आरक्षण कसं गेलं हे आम्ही दाखवून दिलं. त्यामुळे आमच्या आमदारांवर खोटे आरोप लावून त्यांना निलंबित करण्यात आलं आहे. आमच्या आमदारांना निलंबित केलं जाईल, ही माझी शंका होती. ती खरी झाली. ओबीसींसाठी बाराचं आमदार काय आम्ही एकशे सहा आमदारांना निलंबित केलं तरी आम्ही लढा देत राहू, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

    राज्य सरकारने उद्या माझ्यावर हक्कभंग आणला तरी चालेल. पण सांगतो. एक स्टोरी तयार करण्यात आली होती. त्यानुसार आमच्या आमदारांना निलंबित करण्यात आलं. आमच्या एकाही आमदाराने शिवीगाळ केली नाही. शिवी देणारे कोण होते हे सर्वांना माहीत आहे. शिवसेनेच्या सदस्यांनीच धक्काबुक्की दिली. त्यावर भाजपचे आमदार आक्रमक झाले. आमच्या आक्रमक आमदारांना आम्ही दूर करण्याचा प्रयत्न केला. उलट आशिष शेलार यांनी या सर्व आमदारांच्या वतीने अध्यक्षांची माफी मागितली. त्यांची गळाभेटही घेतली. तो विषय संपल्यावर आम्ही बाहेर आलो होतो. पण आमच्या आमदारांना सस्पेंड करण्यासाठी सरकारच्या मंत्र्यांनी स्टोरी रचली, असं ते म्हणाले.

    हे सरकार ओबीसी आरक्षणात फेल गेलं आहे. तसेच ते मराठा आरक्षणातही फेल गेलं आहे. आता मराठा आरक्षणाचा ठराव आणून तो केंद्राकडे पाठवण्याचं घटत असून मराठा समाजाला फसवण्याचा हा प्रकार आहे, असं ते म्हणाले.

    दरम्यान, सभागृहात तालिका अध्यक्षांनी घडलेला प्रकार कथन केल्यानंतर फडणवीस यांनी त्यावर सभागृहात बाजू मांडली. तुम्हाला कोणीही बाचाबाची केली नाही. दालनात शिवसेना आमदारही होते. ही बाब तुम्ही सांगितली नाही. आम्ही रागात होतो. त्यामुळे वाद झाला. पण नंतर वाद मिटल्यावर एकमेकांच्या गळ्यात गळेही घातले. शिवाय काही सदस्यांचे शब्द चुकीचे होते. त्यामुळे तुमची तीनदा माफी मागितली. ते तुम्ही रेकॉर्डवर आणलं नाही. आमच्या सदस्यांची संख्या कमी करण्याचा हा प्रयत्न आहे. हे माझ्या लक्षात आलं आहे, असं त्यांनी सांगितलं.