याला म्हणतात एका दगडात तीन पक्षी मारणे;  बंदला पाठिंबा देणाऱ्या ‘त्या’ नेत्यांना देवेंद्र फडणवीस यांचा जबरस्त टोला

मुंबई :  शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष बंदात सहभागी होणार आहेत. यावरुन माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना जबरस्त टोला लगावला आहे.

शेती सुधारणा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार राज्यात होते. ज्या सुधारणा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात झाल्या, त्या आता देशपातळीवर झाल्या तर त्याला आता विरोध का ? असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.

काँग्रेस पक्षाच्या २०१९ च्या घोषणापत्रातही याचा उल्लेख आहे. त्यात काँग्रेसने स्पष्टपणे म्हटले होते की, काँग्रेस सत्तेत आल्यास बाजार समित्यांचा कायदा निरस्त करण्यात येईल आणि शेतमालाच्या खुल्या व्यापारासाठी व्यवस्था उभी करण्यात येईल.

शरद पवार यांनी ऑगस्ट २०१० आणि नोव्हेंबर २०११ या काळात सर्वच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले आणि त्यात एपीएमसी कायद्यात सुधारणांवर भर दिला होता. बाजारपेठ सुविधा क्षेत्रात खाजगी सहभागाला प्रोत्साहन देण्यावर त्यांचा भर होता.

ऑगस्ट २०१० मध्ये शरद पवार यांनी लिहिलेल्या पत्रात शेती क्षेत्राचा संपूर्ण विकास, रोजगार आणि आर्थिक प्रगतीसाठी चांगल्या बाजाराची आवश्यकता आहे, असे त्यांनीच सांगितले होते. शरद पवार यांच्या आत्मचरित्रात सुद्धा या प्रश्नाचा सविस्तर उहापोह आहे. त्यात त्यांनी तीच भूमिका मांडली, जे कायदे आज पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी पारित केले असल्याचे फडणवीस यावेळी म्हणाले.

द्रमुक पक्ष सुद्धा भारत बंदला पाठिंबा देत असला तरी २०१६ च्या विधानसभा निवडणुकीत शेती सुधारणा विधेयकांचे आश्वासन या पक्षाने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात दिले होते. १२ डिसेंबर २०१९ रोजी स्थायी समितीत अकाली दलाने वेगळी भूमिका घेतली होती. त्यावेळी ते म्हणाले, एपीएमएसी भ्रष्टाचार-राजकारणाचे अड्डे बनले आहेत. केवळ दलालांचा तेथे बोलबाला असतो आणि त्यामुळे एपीएमएसी या शेतकर्‍यांच्या हिताच्या नाहीत.

शिवसेना, द्रमुक, तृणमूल, डावे पक्ष या सर्वांनी सुद्धा त्यावेळी तीच भूमिका घेतली. आज सारे पक्ष वाहत्या गंगेत हात धुण्याच्या भूमिकेत दिसत असल्याची टीका फडणवीस यांनी केली. आज केवळ पंतप्रधान मोदींना विरोध करण्यासाठी सर्वांची दुटप्पी भूमिका पहायला मिळत आहे. जाणीवपूर्वक अराजक निर्माण करण्यासाठी पक्षांची ही भूमिका. पण, शेतकरी सुज्ञ आहेत. ते निश्चितपणे समजूतदारीची भूमिका घेतील. या सर्व सुधारणांची सुरुवात शरद पवार यांनी स्वतः केली आहे. त्यामुळे नवाब मलिक काय म्हणतात त्याला अर्थ नाही.

महाराष्ट्रात आम्ही सत्तेत असताना एक कायदा तयार केला, त्यात किमान हमीभाव नाही दिला तर एक वर्षाची शिक्षा अशी तरतूद करण्यात आली होती. केंद्रातील सरकार हे सचिव नाही तर, पंतप्रधान आणि केंद्रातील मंत्री चालवतात. महाराष्ट्रातील सरकारसारखी स्थिती केंद्रात नाही. कृषी कायद्यावर केवळ आणि केवळ राजकारण होत असल्याचा घणाघात फडणवीसांनी केला.