बंडातात्या यांच्यावर केलेल्या कारवाईचा देवेंद्र फडणवीसांनी केला निषेध, काय म्हणाले नेमकं? : वाचा सविस्तर

बंडातात्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. बंडातात्या यांच्यावर केलेल्या कारवाईचा देवेंद्र फडणवीसांनी निषेध व्यक्त केला आहे.

    मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा राज्य सरकारने आषाढी वारी सोहळ्यावर निर्बंध घातले आहेत. केवळ मानाच्या पालख्यांना पंढरपूरमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. वाखरीपासून दीड किलोमीटर अंतरापर्यंत प्रतिकात्मक पायी वारी काढली जाणार आहे. मात्र सामान्य वारकऱ्यांना मात्र पायी वारीस मनाई करण्यात आली आहे. पायी वारीस मनाई असतानाही शासनाचा आदेश झुगारुन पंढरपूरच्या दिशेने पायी निघालेल्या बंडातात्या कराडकर यांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अखेर ताब्यात घेतलं.

    दरम्यान त्यांना दिघीजवळील संकल्प गार्डन मंगल कार्यालयात ठेवण्यात आलं आहे. मात्र बंडातात्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. बंडातात्या यांच्यावर केलेल्या कारवाईचा देवेंद्र फडणवीसांनी निषेध व्यक्त केला आहे.

    फडणवीस नेमकं काय म्हणाले ?

    वारी हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य घटक आणि विठ्ठल-वारकरी यांचे नाते अवर्णनीय असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. बंडातात्या कराडकर यांना अटक करून सरकारने काय साधलं? काहीच मध्यम मार्ग नव्हता? वारकर्‍यांचा असा अपमान?, असे सवाल देवेंद्र फडणवीसांनी सरकारला केले आहेत.

    तुषार भोसले यांची ठाकरे सरकारवर सडकून टीका

    दरम्यान, बंडातात्यांच्या अटकेनंतर मुघलांपेक्षा ठाकरे सरकार अत्याचारी आहे, असं म्हणत भाजप आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे. औरंगजेबापेक्षाही राज्यातलं सरकार अत्याचारी आहे. मुघलांनी सुद्धा वारकऱ्यांचे इतके हाल केले नव्हते. भागवत धर्माची भगवी पताका घेऊन जाणाऱ्या बंडातात्या आणि वारकऱ्यांना अटक करणाऱ्या सरकारला लाज कशी वाटत नाही? तुमचं डोकं ठिकाणावर आहे का?, असा सवाल तुषार भोसले यांनी विचारला.