सत्तेसाठी आणखी किती लोकांना वाचविणार? उस्मानीवरील सुनावणीनंतर देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

शार्जिल उस्मानी जगाच्या कुठल्याही कोपर्‍यात असेल तर त्याच्या मुसक्या आवळून शोधून आणणार म्हणजे आणणारच असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानसभेत छातीठोकपणे म्हणाले होते.  प्रत्यक्षात काय, तो येऊन गेला, जबाब देऊन गेला. आणि महाविकास आघाडी सरकारने प्रत्यक्षात काय केले असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.

    मुंबई : एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी शरजील उस्मानीची चौकशी अद्यापही पूर्ण झाली नसल्याचे राज्य सरकारच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात सांगण्यात आले. त्याची दखल घेत येत्या गुरुवारी पुन्हा पोलिसांसमोर हजर राहण्याचे निर्देश खंडपीठाने उस्मानीला देत तोपर्यंत कोणतीही कारवाई न करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत. यावरुनच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पून्हा एकदा ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

    शार्जिल उस्मानी जगाच्या कुठल्याही कोपर्‍यात असेल तर त्याच्या मुसक्या आवळून शोधून आणणार म्हणजे आणणारच असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानसभेत छातीठोकपणे म्हणाले होते.  प्रत्यक्षात काय, तो येऊन गेला, जबाब देऊन गेला. आणि महाविकास आघाडी सरकारने प्रत्यक्षात काय केले असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.

    मूळ तक्रारीत भादंविचे 295 अ कलम समाविष्ट असताना सुद्धा एखाद्या विशिष्ट धर्माला लक्ष्य करण्यासाठी लावले जाणारे हे कलम पद्धतशीरपणे एफआयआरमधून वगळले गेले असा आरोपही फडणवीस यांनी केला आहे. उस्मानीवर 153 अ हे कलम लावण्यात आले आहे. हे कलम विविध घटकांमध्ये शत्रूत्त्व निर्माण होईल अशा विधानांसाठी लागते. खरे तर एफआयआर 295 अ, 153 अ या दोन्ही कलमांतर्गत असायला हवा होता असेही ते म्हणाले.

    न्यायव्यवस्था आणि सरकारी प्रशासनतंत्रा विरोधात युद्ध पुकारण्यासाठी 124 अ हे सुद्धा कलम लावायला हवे होते. पण, प्रत्यक्षात उस्मानीला जामीन मिळण्यासाठी मदत केली जात आहे. सत्तेसाठी आणखी किती लोकांना वाचविणार असा सवाल फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे.