लॉक की अनलॉक? पत्रपरिषद की प्रेसरिलीज? ; ठाकरे सरकारच्या कारभारावर देवेंद्र फडणवीसांचा निशाणा

काय सुरू, काय बंद ?, कुठे आणि केव्हापर्यंत?, लॉक की अनलॉक?, पत्रपरिषद की प्रेसरिलीज?, अपरिपक्वता की श्रेयवाद? अशा प्रकारचे अनेक प्रश्न राज्य सरकारला विचारत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला आहे.

    मुंबई: राज्यातील लॉकडाऊन संदर्भात राज्याच्या आपत्ती व्यवस्थापनानं मोठा निर्णय जाहीर केला होता. राज्यात ज्या ठिकाणी कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्क्यांपेक्षा कमी आहे त्याठिकाणी पूर्णपणे अनलॉक केलं जाणार असल्याची घोषणा राज्याचे मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत केली होती. परंतु तासभरातच राज्यातील निर्बंध उठवण्यात आले नाहीत. राज्य सरकारनंच हा निर्णय अद्याप झालेला नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यावरून आता माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारच्या कारभारावर आता टीकास्त्र सोडले आहे.

    ट्विट करत देवेंद्र फडणवीसांची  राज्य सरकारवर टीका 

    काय सुरू, काय बंद ?, कुठे आणि केव्हापर्यंत?, लॉक की अनलॉक?, पत्रपरिषद की प्रेसरिलीज?, अपरिपक्वता की श्रेयवाद? अशा प्रकारचे अनेक प्रश्न राज्य सरकारला विचारत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला आहे.

    विजय वडेट्टीवारांनी लॉकडाऊन संदर्भात घोषणा केल्यानंतर त्यांनी परस्पर घोषणा करून टाकली का, मुख्यमंत्र्यांना त्यांनी कल्पनाच दिली नव्हती का, सरकारमध्येच ‘अनलॉक’बाबत एकमत नाही का, ही घोषणा नेमकी कधी आणि कुणी करणं योग्य आहे, की हा श्रेयवादाचा विषय आहे, अशी चर्चा या निमित्ताने सुरू झाली असून भाजप नेते आक्रमक झाले आहेत.