devendra fadanvis

विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणाले की, आम्ही या प्रतिविधानसभेतून सरकारचा बुरखा फाडला आहे. सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले आहे.

    मुंबई: बारा भाजप सदस्यांच्या निलंबनानंतर विरोधकांनी विधानसभेबाहेरच ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर यांच्या अध्यक्षतेखाली पाच तास प्रतिविधानसभा चालवली. त्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणाले की, आम्ही या प्रतिविधानसभेतून सरकारचा बुरखा फाडला आहे. सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले आहे. शेतकरी, विद्यार्थी, मराठा तरुण, ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील.

    सत्ता डोक्यात गेलेले लोक टिकत नाहीत
    यावेळी फडणवीस यांनी महाविकास आघाडीला कौरवांची उपमा दिली  ते म्हणाले की, ठाकरे सरकारचा अहंकार दुर्योधनाच्या अहंकारासारखाच आहे. पांडवांनी कौरवांना केवळ सात गावे मागितली होती. पण सुईच्या टोका एवढीही जागा देणार नाही, असे म्हणत दुर्योधनाचा अहंकार शिगेला पोहोचला होता. दुर्योधनाच्या अहंकारासारखाच ठाकरे सरकारचा अहंकारही शिगेला पोहोचला आहे. डोक्यात अहंकार घेऊन आलेले हे सरकार आहे. सत्ता डोक्यात जाते तेव्हा विरोधी पक्षाची गरज राहत नाही. मी मुख्यमंत्री असताना असे तणावाचे प्रसंग आले. त्यावेळी मी स्वत: जाऊन चर्चा करायचो. आता कोणीही चर्चा करण्यासाठी आले नाही. कारण डोक्यात सत्ता गेली आहे. सत्ता डोक्यात गेलेले असे लोक अधिक काळ टिकत नाही, असेही ते म्हणाले.

    सूचना सूचवल्या हे अपेक्षितच होते
    यावेळी त्यांनी कृषी कायद्याबाबतही प्रतिक्रिया व्यक्त केली. राज्य सरकारने तीन कायदे सभागृहात मांडले. त्यांनी कृषी कायदे फेटाळले नाहीत हे चांगले झाले. कृषी कायद्यात त्यांनी काही सूचना सूचवल्या आहेत. हे अपेक्षितच होते. त्यातील दोन कायदे महाराष्ट्रात अस्तित्वात आहेत, असेही त्यांनी सांगितले.