करुणा शर्मा राजकारणात येणार; मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची भेट घेतली

शर्मा यांनी आपण समाजसेविका आहोत. पुढे राजकारणातही येईल, असं सांगितले. इतकंच नाही तर आपल्याला आमदारकीची निवडणूक लढवायची असल्याचा इशारा करुणा यांनी दिला.

    मुंबई : रेणू शर्मा प्रकरणानंतर चर्चेत आलेल्या आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी नातं मान्य केलेल्या करुणा शर्मा आता राजकारणात पाऊल टाकणार आहेत. तशी माहिती स्वत: त्यांनी दिली. करुणा यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची भेट घेतली.

    शर्मा यांनी आपण समाजसेविका आहोत. पुढे राजकारणातही येईल, असं सांगितले. इतकंच नाही तर आपल्याला आमदारकीची निवडणूक लढवायची असल्याचा इशारा करुणा यांनी दिला.

    महापौरांची भेट घेऊन करुणा यांनी स्वच्छतागृह आणि कचऱ्याचा प्रश्न मांडल्यानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्तांकडेही एक तक्रार केली आहे.

    काय आहे धनंजय मुंडे प्रकरण

    महाराष्ट्राचे सामजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा या महिलेने बलात्काराचा आरोप केला होता. ११ जानेवारीला त्यांनी मुंबईच्या ओशिवरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. धनंजय मुंडे हे गेल्याकाही वर्षांपासून आपल्यावर अत्याचार करत असल्याचं तिने म्हटलंय. सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटू लागल्यानंतर धनंजय मुंडे यांनी मंगळवारी फेसबुकवर एक पोस्ट टाकली, आणि रेणू यांनी केलेले सर्व आरोप त्यांनी फेटाळून लावले. करुणा शर्मा या महिलेसोबत २००३ पासून आपले परस्पर सहमतीने संबंध होते. ही बाब माझे कुटुंबिय, पत्नी व मित्रपरिवाराला माहित होती. परस्परसहमतीच्या संबंधातून आम्हाला एक मुलगा आणि मुलगी अशी दोन मुले झाली. सदर मुलांना मी माझे नाव दिले आहे. शाळेच्या दाखल्यावरही माझे नाव आहे. ही मुले माझ्यासोबत राहतात, करुणा शर्मा ही महिला या मुलांची आई असल्याने त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी मी स्वीकारलेली आहे, अशी कबुली धनंजय मुंडे यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवर दिली.