धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे पत्राद्वारे केली ‘ही’ मागणी

सरकारने कोरोना काळात कर्तव्य बजावताना पत्रकारांना कोरोनाने मृत्यू झाल्यास त्यांना ५० लाखांचे विमा कवच देण्याची घोषणा केली होती. त्यामुळे या दोन पत्रकारांच्या कुटुंबियांना सरकारने घोषित केल्याप्रमाणे प्रत्येकी पन्नास लाख रुपये विमा संरक्षण मदत करावी. अशी मागणी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे.

मुंबई : राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. कोरोनामुळे मराठवाड्यात दोन पत्रकारांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या दोन पत्रकारांच्या कुटुंबियांना सरकारने घोषित केल्याप्रमाणे प्रत्येकी पन्नास लाख रुपये विमा संरक्षण मदत करावी. अशी मागणी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.

कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये कर्तव्यावर असताना या दोन्ही पत्रकारांना कोरोनाची लागण झाली होती. तसेच सरकारने कोरोना काळात कर्तव्य बजावताना पत्रकारांना कोरोनाने मृत्यू झाल्यास त्यांना ५० लाखांचे विमा कवच देण्याची घोषणा केली होती. बीडमधील गेवराई येथील पत्रकार संतोष भोसले ४८ तर लातूरमधील ज्येष्ठ पत्रकार गंगाधर सोमवंशी ६१ यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

तसेच दोन्ही पत्रकारांची कौटूंबिक परिस्थिती जेमतेम असल्यामुळे सरकारने घोषणा केल्याप्रमाणे दोन्ही पत्रकारांना मदत करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्याकडे केली होती. या मागणीची धनंजय मुंडे यांनी तात्काळ दखल घेतली आहे. त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांना पत्राद्वारे सरकारने घोषणा केल्याप्रमाणे मयत कुटुंबाला मदत करण्याची विनंती केली आहे. यामुळे राज्यातील पत्रकारांत समाधान व्यक्त होताना दिसत आहे.