डीएचएफएल प्रकरण: राणा कपूरच्या पत्नी आणि मुलींचा जामीन अर्ज फेटाळला

सीबीआय न्यायालयाने दिलेला आदेश अत्यंत बेकायदेशीर आणि अयोग्य असल्याचा दावा याचिकेतून केला आहे. चौकशीदरम्यान आपल्याला अटक कऱण्यात आली नसून आपण सीबीआयला तपासात संपूर्ण सहकार्य केले असल्याचा दावा त्यांनी याचिकेत केला आहे. या प्रकरणातील सर्व पुरावे कागदोपत्री स्वरूपाचे असून आधीच सीबीआयच्या ताब्यात आहेत आणि त्यामुळे कागदपत्रांशी किंवा पुराव्यांशी छेडछाड करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

    मुंबई – डीएचएफएलशी संबंधित कथित भ्रष्टाचार प्रकरणात येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांची पत्नी बिंदू कपूर आणि मुली राधा आणि रोशनी कपूर यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिला असून त्यांच्या जामीन अर्ज जामीन फेटाळून लावला.

    येस बँकेच्या ३७०० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी सीबीआय आणि ईडीकडून तपास केला जात आहे. आर्थिक अनियमितता आणि वारेमाप कर्ज वाटप यामुळे रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) येस बँकेवर ५ मार्चपासून निर्बंध लागू केले होते. त्यानंतर टप्याटप्याने ते शिथिल केले आणि येस बँकेचे व्यवहार पूर्ववत केले होते. मात्र, बड्या उद्योगांना दिलेले कर्जे बुडीत खात्यात गेल्याने बँकेची आर्थिक स्थिती कमकुवत झाली आहे.

    हा घोटाळा उघड झाल्यानंतर येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची पत्नी बिंदू आणि मुली रोशनी आणि राधा कपूर खन्ना यांनाही अटक करण्यात आली. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने १८ सप्टेंबर रोजी त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावत त्यांची १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. त्या निर्णयाला तिघिंनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

    सीबीआय न्यायालयाने दिलेला आदेश अत्यंत बेकायदेशीर आणि अयोग्य असल्याचा दावा याचिकेतून केला आहे. चौकशीदरम्यान आपल्याला अटक कऱण्यात आली नसून आपण सीबीआयला तपासात संपूर्ण सहकार्य केले असल्याचा दावा त्यांनी याचिकेत केला आहे. या प्रकरणातील सर्व पुरावे कागदोपत्री स्वरूपाचे असून आधीच सीबीआयच्या ताब्यात आहेत आणि त्यामुळे कागदपत्रांशी किंवा पुराव्यांशी छेडछाड करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

    तसेच कथित व्यवहारांमध्ये किंवा येस बँकेमध्ये किंवा त्यांच्या दैनंदिन व्यवहारात आपली कोणतीही भूमिका नव्हती. असा दावाही याचिकेतून करण्यात आला होता. त्यांच्या दाव्याला सीबीआयकडून विरोध करण्यात आला होता. दोन्ही पक्षकारांची बाजू ऐकून घेत न्यांयालयाने आपला निकाल राखून ठेवला होता.

    तो निर्णय न्या. भारती डांगरे यांनी मंगळवारी जाहीर केला, त्यानुसार, याचिकाकर्त्यांवरील आरोप गंभीर स्वरुपाचे आहेत ज्यामुळे राज्याच्या आर्थिक स्थितीवर परिणाम झाला असून जनतेचीही मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली आहे. अशा प्रकाराच्या गुन्ह्यांमुळे देशाच्या विकासात अडथळा निर्माण होतो ज्यामुळे राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला प्रचंड नुकसान होऊन जनतेच्या कायदा आणि सुव्यवस्थेवरील विश्वासालाही धक्का पोहोचत असल्याचेही न्या. डांगरे यांनी आपल्या आदेशात अधोरेखित केले आहे. आणि राणा कपूर यांची पत्नी बिंदू, मुली राधा व रोशनी कपूर यांना दिलासा देण्यास नकार देत त्यांचा जामीन अर्ज जामीन फेटाळून लावला.