दिलीपकुमार यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीतील सोनेरी युगाचा अंत : नाना पटोले

सामान्य माणसाचे दुःख रुपेरी पडद्यावर साकारणारा ट्रॅजेडी किंग अभिनयसम्राट दिलीपकुमार यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीतील सोनेरी युगाचा अंत झाला आहे, अशा शब्दांत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या आहेत.

    मुंबई : ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. दिलीपकुमार यांनी आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर चित्रपटसृष्टीत अढळ स्थान निर्माण केले. सामान्य माणसाचे दुःख रुपेरी पडद्यावर साकारणारा ट्रॅजेडी किंग अभिनयसम्राट दिलीपकुमार यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीतील सोनेरी युगाचा अंत झाला आहे, अशा शब्दांत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या आहेत.

    दिलीपकुमार यांनी ज्वार भाटा सिनेमातून १९४४ मध्ये चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. बाबूल, दीदार, आन, गंगा-जमुना, मधुमती, देवदास, मुगल-ए-आझम, गंगा जमुना, राम और श्याम, क्रांती, शक्ती, मशाल, कर्मा, सौदागर आदी चित्रपटातून आपल्या अभिनयाने पाच दशके त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.

    दिलीपकुमार यांनी चित्रपटसृष्टीला समृद्ध केले. त्यांच्या उंचीचा अभिनेता पुन्हा होणे नाही. चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांसाठी ते एक प्रेरणास्रोत ठरले. हिंदी चित्रपटसृष्टीतील सदाबहार लखलखता तारा आज निखळला असला तरी आपल्या अभिनयाच्या माध्यमातून दिलीपकुमार कायम स्मरणात राहतील. दिलीपकुमार यांना श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे, असे पटोले म्हणाले.