एसटीच्या चालक-वाहकांचा प्रवासी नियोजनात थेट सहभाग! वाहतूकीच्या नियाेजनासाठी आपल्या सूचना लेखी स्वरुपात देण्याचे आवाहन

एसटीच्या प्रवासी वाहतुकी संदर्भात नवीन वेळापत्रक तयार करणे, नवीन बस मार्ग सुरु करणे, सद्या सुरु असलेल्या मार्गांमध्ये प्रवासी मागणी नुसार बदल करणे, मार्गावरील थांब्याची संख्या निश्चित करणे, विशिष्ट मार्गासाठी विशिष्ट वाहनांचा प्रकार अवलंबणे यासारख्या उत्पन्न वाढीच्या नियोजनामध्ये चालक वाहकांच्या अनुभवाचा फायदा व्हावा या उद्देशाने महामंडळाने आगार पातळीवर चालक, वाहक, वाहतूक नियंत्रक यांना प्रवासीभिमुख वाहतुकीच्या नियोजनासाठी आपल्या सूचना लेखी स्वरूपात देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

  मुंबई :एसटीच्या प्रवासी वाहतुकी संदर्भात नवीन वेळापत्रक तयार करणे, नवीन बस मार्ग सुरु करणे, सद्या सुरु असलेल्या मार्गांमध्ये प्रवासी मागणी नुसार बदल करणे, मार्गावरील थांब्याची संख्या निश्चित करणे, विशिष्ट मार्गासाठी विशिष्ट वाहनांचा प्रकार अवलंबणे यासारख्या उत्पन्न वाढीच्या नियोजनामध्ये चालक वाहकांच्या अनुभवाचा फायदा व्हावा या उद्देशाने महामंडळाने आगार पातळीवर चालक, वाहक, वाहतूक नियंत्रक यांना प्रवासीभिमुख वाहतुकीच्या नियोजनासाठी आपल्या सूचना लेखी स्वरूपात देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

  एसटी महामंडळामध्ये चालक, वाहक हे प्रमुख घटक आहेत. एसटीच्या सर्व बस फेऱ्यांची प्रत्यक्ष अमलबजावणी यांच्यामार्फत केली जाते. १२ महिने, २४ तास चालक,वाहक एसटीच्या माध्यमातून रस्त्यावर प्रवास करीत असतात. साहजिकच प्रवाशांचा सततचा संपर्क यामुळे विविध बस फेऱ्या सुरू करणे, त्यावरील थांबे निश्चित करणे, कोणत्या प्रकारची बस वापरावी या बद्दल माहिती देणे अशा उत्पन्न वाढीच्या अनेक सूचना चालक वाहक आपल्या एसटी प्रशासानाकडे करीत असतात. परंतु त्यांची दखल घेतली जातेच असे नाही, परंतु या वेळेला महामंळाने एक परिपत्रक काढुन प्रवासी वाहतुकीच्या नियोजनात चालक वाहकांच्या सूचना तक्रारी लेखी स्वरूपात नोंदवून त्यांचा सहभाग वाढविण्याची योजना आखली आहे.

  दरम्यान, यापूर्वी गेली अनेक वर्ष विभागीय स्तरावर काही मोजक्या अधिकाऱ्यांमार्फत प्रवासी वाहतुकीचे नियोजन केले जात असे परंतु अनुभवा अभावी सदर नियोजनातून अपेक्षित प्रवासी संख्येमध्ये वाढ होत नाही हे महामंडळाच्या लक्षात आले त्यामुळे प्रत्यक्ष रस्त्यावर काम करणाऱ्या चालक वाहकांना सहभागी करून घेण्याचा एक चांगला उपक्रम महामंडळाकडून राबविला जात आहे.

  विशेष म्हणजे आगार पातळीवर लेखी स्वरूपात दिल्या जाणाऱ्या या सूचनांचे योग्य नोंद ठेवली जाणारा असून त्या आधारे वेळापत्रक निश्चित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. विशेष म्हणजे चालक वाहकांनी दिलेल्या सूचनांची पोच पत्राद्वारे आगार प्रशासनाने त्यांना द्यावयाची आहे. सध्या एसटी महामंडळामध्ये सुमारे ३७ हजार चालक व ३७ हजार वाहक कार्यरत आहेत. यांच्या अनुभवाचा फायदा महामंडळाच्या उत्पन्न वाढीसाठी निश्चित होईल यात शंका नाही. यासाठी आगार पातळीवर चालक, वाहकांना प्रवासी वाहतूक नियोजना संदर्भात आपल्या सूचना तक्रारी लेखी स्वरूपात आगार प्रशासनाकडे द्याव्यात असे आवाहन केले आहे.

  ‘ प्रवासी वाहतूक नियोजन चालक-वाहकांच्या सुचना विचारांत घेतल्यास एसटी महामंडळाला प्रवासी व उत्पन्न वाढीसाठी निश्चित फायदा होईल. अशा सर्वसमावेशक उपक्रमांचे आम्ही स्वागतच करतो!’’

  श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी कॉंग्रेस