सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचं गलिच्छ राजकारण – आदित्य ठाकरे

  • 'हे तर गलिच्छ राजकारण, पण मी संयम बाळगलाय...' असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी आता विरोधकांना उत्तर दिलं आहे. कोरोना संकटाने देशभर हाहाकार माजवला आहे. महाराष्ट्राचे सरकारही कोरोनाचा पराभव करण्यासाठी शर्थ करीत आहे. बहुधा, महाराष्ट्र सरकारचे यश, लोकप्रियता ज्यांना खुपते त्यांनी सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचे घाणेरडे राजकारण सुरु केले आहे.

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलीस यांच्यावर बरीच टीका सुरू आहे. तर सुशांत सिंग राजपूतच्या वडिलांनी याप्रकरणी पटनामध्ये पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर बिहार पोलीस देखील मुंबईत येऊन तपास करू लागले. मुंबई पोलिसांवर एकंदरीत अविश्वास दाखवल्याचं समजलं जात आहे. परंतु या सर्व गोष्टीनंतर आता या प्रकरणाला एक राजकीय वळण लागलं आहे. मुंबई पोलिसांनंतर आता राज्य सरकार आणि ठाकरे कुटुंबावरही टीकास्त्र सुरू झालं आहे. परंतु या सगळ्याला राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी एका परिपत्रकाद्वारे सविस्तर उत्तर दिलं आहे.

‘हे तर गलिच्छ राजकारण, पण मी संयम बाळगलाय…’ असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी आता विरोधकांना उत्तर दिलं आहे. कोरोना संकटाने देशभर हाहाकार माजवला आहे. महाराष्ट्राचे सरकारही कोरोनाचा पराभव करण्यासाठी शर्थ करीत आहे. बहुधा, महाराष्ट्र सरकारचे यश, लोकप्रियता ज्यांना खुपते त्यांनी सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचे घाणेरडे राजकारण सुरु केले आहे. सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी व्यक्तिश: माझ्यावर तसेच ठाकरे कुटुंबावर नाहक चिखलफेक करण्यात येत आहे. ही एक वैफल्यातून उमटलेली राजकीय पोटदुखीच आहे. मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा हा प्रकार माणुसकीला कलंकित करणारा आहे. असं आदित्य ठाकरें यांनी म्हटलं आहे. 

सुशांतसिंग राजपूतचा मृत्यू दुर्दैवी तितकाच धक्कादायक आहे. मुंबईचे पोलीस या प्रकरणाचा खोलवर तपास करीत आहेत. मी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा नातू म्हणून सांगू इच्छितो, महाराष्ट्राच्या, शिवसेनेच्या व ठाकरे कुटुंबाच्या प्रतिष्ठेस तडा जाईल असे कृत्य माझ्या हातून कदापि होणार नाही. फालतू आरोप करणाऱ्यांनी हे समजून घेतलं पाहिजे. या प्रकरणाची कुणाकडे काही विशेष माहिती असेल तर त्यांनी ती पोलिसांनाच द्यायला हवी. असं आदित्य ठाकरे म्हणाले.