फटाके विक्रीला बंदीच्या मुद्द्यावरुन मंत्रिमंडळात मतभेद, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार अंतिम निर्णय

मुंबई : दिल्लीतील केजरीवाल सरकार प्रमाणेच दिवाळीच्या काळात फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घालण्याच्या मुद्द्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली, मात्र यावर एकवाक्यता होऊ शकली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील कोरोनाचे संकट लक्षात घेता राज्यात फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घालावी, यावर उपमुख्यमंत्री अजित पवार आग्रही होते.

मुंबई : दिल्लीतील केजरीवाल सरकार प्रमाणेच दिवाळीच्या काळात फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घालण्याच्या मुद्द्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली, मात्र यावर एकवाक्यता होऊ शकली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील कोरोनाचे संकट लक्षात घेता राज्यात फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घालावी, यावर उपमुख्यमंत्री अजित पवार आग्रही होते. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही अजित पवारांच्या मागणीचे समर्थन केले. मात्र इतर मंत्री या मुद्द्यावर सहमत नव्हते. कोरोना संकटाच्या काळात झालेल्या लॉकडाऊनमुळे आधीच व्यावसायिकांची अवस्था बिकट आहे, त्यात अचानक फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घातली तर व्यावसायिकांना मोठ्या तोट्याला सामोरे जावे लागेल, असे काही जणांचे मत होते. त्यामुळे फटाक्यांवर बंदी घालण्याऐवजी, नागरिकांना जागरुक राहण्याचे आवाहन करावे, असा सल्ला या मंत्र्यांनी दिला. मंत्रिमंडळात याबाबत सहमती होऊ न शकल्याने, याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपविण्यात आले आहेत. सर्व पक्षांशी चर्चा करुन याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अंतिम निर्णय घेणार आहेत.