
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड(jitendra whad) आणि उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत(uday samant) या महाविकास आघाडीतल्या(mahavikas aghadi) दोन मंत्र्यांमध्ये वाद निर्माण झाल्याचे चित्र बुधवारी दिसले.
मुंबई: गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड(jitendra whad) आणि उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत(uday samant) या महाविकास आघाडीतल्या(mahavikas aghadi) दोन मंत्र्यांमध्ये वाद निर्माण झाल्याचे चित्र बुधवारी दिसले. आव्हाड यांच्या गृहनिर्माण विभागाच्या बैठकीवरून हा वाद निर्माण झाला आहे. गृहनिर्माण मंत्र्यांना न विचारता उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हाडाची बैठक लावल्याचे समजल्याने गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड नाराज झाले आहेत.
बैठकीची कल्पना मंत्री आव्हाड यांना नव्हती
म्हाडाचे माजी सभापती आणि विद्यमान उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आपल्या तत्कालीन कार्यकाळात काही उर्वरित कामाच्या बाबतीत गृहनिर्माण अधिकार्यांना विचारणा करण्यासाठी बैठक घेतली होती. या बैठकीची कल्पना मंत्री जितेंद्र आव्हाड यांना देण्यात आली नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या दोन्ही मंत्र्यांमध्ये वाद निर्माण झाला आहे. आव्हाड यांनी अद्याप उघडपणे नाराजी व्यक्त केली नसली, तरी अंतर्गत वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. यासंदर्भात आव्हाड यांच्याशी संपर्क केला असता, ते बैठकीत व्यस्त असल्याचे सांगण्यात आले.
आव्हाडांचा कोणीतरी गैरसमज करून दिला – उदय सामंत
यासंदर्भात स्वतः उदय सामंत यांनी खुलासा केला आहे. जितेंद्र आव्हाड हे मंत्रीमंडळातील ज्येष्ठ मंत्री आहेत. त्यांचा कोणीतरी गैरसमज करून दिला आहे. कोणाच्याही अधिकारावर गदा आणण्याचा माझा प्रयत्न नाही, असे ते म्हणाले. कोणत्याही बैठकीचे मी आयोजन केलेले नाही. मी म्हाडाचा अध्यक्ष असताना माझ्या मतदारसंघातील काही कामांसाठी कोट्यावधी रूपये मंजूर झाले, ती कामे अजूनही झालेली नाहीत. मतदारसंघातील आमदार म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून त्या कामांचे काय झाले हे पाहणे माझे कर्तव्य आहे, म्हणून मी म्हाडामध्ये जाणार होतो. ती कामे होतील, असा शब्द मला उपाध्यक्षांनी द्यावा, माझा तिकडे जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे सामंत म्हणाले. मी म्हाडाचे उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर यांच्या दालनात जावून अधिकार्यांना भेटणार होतो. बैठक घ्यायची असती तर ती विधानभवनात घेतली असती, असे ते म्हणाले.