land

शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर असलेल्या नावानुसार प्रत्येकाचा हिस्सा निश्चित केला जातो. तसेच वडिलोपार्जित असलेल्या जमिनिच्या सातबारा अभिलेखावर बहीण भावांची तसेच सहहिस्सेदारांची नावे असतात. त्याच नावांनुसार जमिनीची वाटणी करुन ताब्यात दिली जाते.

मुंबई : शेतजमिनीच्या वाटणीवरुन कुटुंबात वादविवाद होत असतात. अनेकदा हे वाद जीवावर बेततात तर न्यायालयाच्या उंबरठ्यावर पोहचतात. जमिनीच्या हिस्स्यावरुन होणाऱ्या वादाचे कारण असणाऱ्या पोटहिस्स्याचे आता स्वतंत्र सातबारा तयार केला जाणार आहे. यासाठी भूमी अभिलेख विभाग विशेष मोहिमेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा सातबारा अभिलेख हिस्स्याप्रमाणे वेगळा केला जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच पोट हिस्स्यावरुन होणारे वादही कमी होतील.

शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर असलेल्या नावानुसार प्रत्येकाचा हिस्सा निश्चित केला जातो. तसेच वडिलोपार्जित असलेल्या जमिनिच्या सातबारा अभिलेखावर बहीण भावांची तसेच सहहिस्सेदारांची नावे असतात. त्याच नावांनुसार जमिनीची वाटणी करुन ताब्यात दिली जाते. परंतु अनेकदा सातबारा एक असल्यामुळे पोटहिस्स्यासाठी भांडण होतात. या भांडणाचे पडसाद न्यायालयापर्यंत पोहचतात. वाटणी करण्यात आलेल्या जमिनीनुसार वहिवाटही असते. पोटहिस्स्याचा स्वतंत्र सातबारा अभिलेख तयार करण्यासाठी भूमी अभिलेख उपसंचालक यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.

याच समितीने केलेल्या शिफारशीनुसार भूमी अभिलेख विभागाच्या संचालकांनी अभिलेख पोटहिस्सा मोहीम राज्यभर राबविण्याचा निर्णय घेतला आहे. सरपंच, तलाठी व ग्रामसेवक यांच्या सहकार्याने सभा घेऊन या मोहिमेची माहिती देण्यात येणार आहे. संमतीने पोटहिस्याचा सातबारा स्वतंत्र करायचा असेल, तर त्यासाठी तारीख निश्चित होईल आणि भूमिअभिलेख विभागाचे अधिकारी, कर्मचारी गावात येऊन अर्ज स्वीकारतील.

आठवडाभरात त्या अर्जांवर कार्यवाही होणार असून, सर्व हिस्सेदारांच्या स्वाक्षऱ्या घेतल्यावर प्रत्येकाचे स्वतंत्र नकाशे करून तहसीलदारांकडे वर्ग करण्यात येणार आहेत. तहसीलदार सातबारा स्वतंत्र करतील.यासाठी एक हजार रुपये एवढा शुल्क आकारला जाईल. जर शेतजमिनीच्या मोजणीची आवश्‍यकता नसेल तर विना मोजणी सातबारा आणि स्वतंत्र नकाशे करून घेता येणार आहेत. या मोहिमेचा लाखो शेतकऱ्यांना फायदा होईल. तसेच या मोहिमेमुळे हिस्सेदारीसाठी होणाऱ्या भांडणेही कमी होतील.