कोत्या मनाने विरोध करू नका, खासदार विनायक राऊतांना भाजप नेत्यांचा सल्ला!

राजकारण हे महाराष्ट्राच्या जनतेच्या आशीर्वादासाठीच असावे, महाराष्ट्राच्या जनतेचे लक्ष वेधून घेण्यासाठीच्या बाष्कळ बोलघेवडेपणाचे नसावे.” असा टोला प्रमोद जठार यांनी विनायक राऊतांना लगावला आहे.

  दादर येथील शिवाजी पार्कमधील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट देण्याचा नैतिक अधिकार नारायण राणे यांना नाही, या शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्या टीकेचा भाजप नेत्यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी विनायक राऊतांनी कोत्या मनाने विरोध करू नये असं म्हटले आहे.

  दर्शन कुणीही घेऊ शकते

  ‘छोटे दिल से कोई बडा नही होता, टुटे मन से कोई खडा नही होता’, असा टोला मुनगंटीवर यांनी राऊत यांना लगावला. ते म्हणाले की, ‘केंद्रीय मंत्री नारायण राणे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीच्या जागेवर येऊन आशिर्वाद घेत असतील तर कोत्या मनाने आम्ही येऊ देणार नाही, असा विरोध करु नये. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार ही काही एखाद्या कंपनीची शेअर्स इक्विटी नाही. त्यांचे दर्शन कुणीही घेऊ शकते. असं मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

  काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत मने कोती झाली

  सिंधुदूर्गचे माजी आमदार जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार म्हणाले की, “बाळासाहेब ठाकरे हे राष्ट्रपुरुष आहेत, हिंदूहृदयसम्राट आहेत. त्यांचे स्मारक हे “शिवतीर्थ” आहे आणि कोणीही त्याचे दर्शन घेऊ शकतो. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नादाला लागून आता तुमची मने कोती आणि छोटी झाली आहेत. राजकारणात मतभेद असतातच. जसे ते राज ठाकरे आणि बाळासाहेबांमध्ये होते, नारायणराव राणे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्ये होते. पण यांच्यामध्ये मतभेद असले तरी मनभेद नव्हते हे आजवर अनेकदा स्पष्ट झाले आहे.”

  “शिवतीर्थाला भेट देत नारायण राणेंनीही बाळासाहेबांप्रतीचा आदर आणि आपल्या नेक दिलाचे दर्शन घडवले आहे. राजकारण हे महाराष्ट्राच्या जनतेच्या आशीर्वादासाठीच असावे, महाराष्ट्राच्या जनतेचे लक्ष वेधून घेण्यासाठीच्या बाष्कळ बोलघेवडेपणाचे नसावे.” असा टोला प्रमोद जठार यांनी विनायक राऊतांना लगावला आहे.