दाऊदला भारतात आणण्यासाठी सर्वोत्तोपरी प्रयत्न करा – रोहित पवार

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कराचीमध्ये असल्याची माहिती पाकिस्तानने दिली होती. कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहिम सध्या पाकिस्तानातील कराची येथे असल्याचं वृत्त मिळाल्यावर, दाऊदला भारतात आणण्यासाठी सर्वोत्तोपरी प्रयत्न करा, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली होती.

रोहित पवार यांनी ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग करुन ही मागणी केली होती. दाऊद इब्राहीम कराचीत असल्याचं पाकिस्तानं कबूल केलं आहे. त्याला भारतात आणण्यासाठी सर्वोत्तोपरी प्रयत्न करा, अशी मी पतंप्रधान नरेंद्र मोदींना विनंती करतो. दाऊदला कुठल्याही परिस्थितीत भारतात आणा, असं रोहित पवार म्हणाले आहेत.

दाऊद इब्राहिम कराची शहरात असल्याच्या वृत्ताला पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानेही दुजोरा दिला होता. दाऊद इब्राहिमवर मुंबईमध्ये १९९३ मध्ये झालेल्या दहशतवादी बॉम्बहल्ल्याचा कट रचल्याचा आरोप आहे. यामागे तोच मास्टरमाइंड असल्याचा आरोप आहे. कराची क्लिफ्टन, सौदी मशिदीजवळ व्हाइट हाऊस असा दाऊदचा पत्ता पाकिस्तानने दिला होता.

तसेच दाऊद कराचीमध्ये असल्याच्या अधिसूचनेनंतर हे वृत्त भारतात सगळीकडे प्रसिद्ध झालं. त्यानंतर रोहित पवारांनी मोदींकडे दाऊदला कुठल्याही परिस्थितीत भारतात आणा, अशी मागणी केली होती. मात्र आता २४ तासांच्या आतच पाकिस्तानने यू-टर्न घेत दाऊद आपल्या देशात वास्तव्यास नसल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन प्रसिद्ध केलं असून, हे वृत्त निराधार आणि दिशाभूल करणारे आहे. असं म्हटलं आहे.