डॉक्टरांचा अलगीकरण कालावधी ५ दिवसांवरून १ दिवसावर

  • रुग्णालयांच्या नव्या सर्क्युलर विरोधात डॉक्टर वर्गात असंतोषाचे वातावरण

मुंबई.  मुंबई महानगरपालिकेच्या केईएम (KEM) , सायन (Sayan hospital) व नायर (Nayar) या वैद्यकीय महाविद्यालयांमधील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येचे कारण देत  कोरोना वॉर्डात असलेल्या निवासी डॉक्टरांच्या विलगीकरणाचा कालावधी ५ दिवसांवरून १ दिवसावर केला असल्याने डॉक्टरांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे. आता पर्यंत कोरोना ड्युटीवरील डॉक्टरांना सात ते १५ दिवस काम केल्यावर सात दिवस क्वारंटाईन करण्यात येत होते. मात्र आता पालिकेच्या आरोग्य विभागाने नॉन-कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांचा विश्रांती कालावधी कमी केला आहे. या निर्णयाविरोधात केईएम सायन  मार्डकडून शुक्रवारपासून सात दिवस निषेध आंदोलन करण्यात येणार आहे.


डॉक्टरांचा अलगीकरण कालावधी कमी केला असल्याच्या संदर्भातील परिपत्रक नुकतेच पालिकेकडून जारी करण्यात असून, त्याची अंमलबजावणी १० सप्टेंबरपासून करण्यात आली. नव्या परिपत्रकानुसार, कोरोना ड्युटीवर काम केल्यानंतर डॉक्टरांना एक दिवसांची विश्रांती आणि त्यानंतर नॉन-कोविडच्या ड्युटीवर डॉक्टरांना रूजू होण्याचे आदेश पालिकेने दिले आहेत. परंतु कोविडच्या ड्युटीवर काम करताना डॉक्टरांना अनेक मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. त्यामुळे डॉक्टरांचा विश्रांतीचा कालावधी कमी करण्यात येऊ नये यासाठी सायन हॉस्पिटलमधील मार्डने सात दिवस आंदोलन पुकारले आहे. यामध्ये पहिल्या दिवशी हॉस्पिटलमधील ओपीडी, वॉर्ड आणि शस्त्रक्रिया विभागातील डॉक्टर डाव्या हाताला काळी फित बांधून निषेध करणार आहेत. तर दुसर्‍या दिवशी नैराश्यासाठी निळी फित, चिंतेसाठी हिरवी फित, रागासाठी लाल फित, सचोटीसाठी गडद निळा, आशावाद यासाठी पिवळी आणि शेवटच्या दिवशी सफेद रंगाची फित लावण्यात येणार असल्याचे सायन हॉस्पिटलमधील मार्ड संघटनेकडून सांगण्यात आले.

निवासी डॉक्टरांना विश्वासात घेऊन पालिकेकडून निर्णय घेतला जात नाही. कोविड रुग्णसेवा बजावणाऱ्या निवासी डॉक्टरांचे शैक्षणिक अभ्यासक्रम रखडले आहेत. तरीसुद्धा त्यांच्याकडून शैक्षणिक शुल्क आकारण्याची सक्ती केली जात आहे, गेल्या ६ ते ७ महिन्यांपासून संबंध निवासी वैद्यकीय अधिकारी कोरोना रुग्णसेवेत सामावून घेतल्यामुळे त्यांचे प्रबंध होऊ शकले नाही त्याबद्दल सुद्धा विद्यापीठाकडून काही निर्णय होत नाही सर्वच पातळीवर वारंवार पाठपुरावा करून सुद्धा या डॉक्टरांना दिलासा मिळत नसल्यामुळे निवासी डॉक्टरांमध्ये मानसिक तणाव आणि नैराश्य येत आहे

-डॉ. दीपक मुंढे, अध्यक्ष, केईएम मार्ड.