अनिल परब यांना स्वत:हून अटक करा नाही तर…. चंद्रकांत पाटील यांचा ठाकरे सरकारला इशारा

 “महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे.” असे संजय राऊत म्हणाले होते. त्यामुळे अनिल परब यांना हे सरकार स्वतःहून अटक करेल अशी शक्यता आहे. अनिल परब यांच्याविरोधातील तक्रार तयार आहे. जर सरकारने स्वतःहून अटक केली नाही, तर आम्ही लवकरच तक्रार दाखल करू, असा इशारा पाटील यांनी दिला.

    पुणे : राज्यात कायद्याचे राज्य आहे, या शिवसेना नेते संजय राऊत यांच्या वक्तव्याचा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी समाचार घेतला आहे. राज्यात कायद्याचे राज्य आहे तर सरकारने अनिल परब यांना स्वत:हून अटक करा. पाटील यांनी ट्विट करत संजय राऊतांवर प्रश्नांचा भडिमार केला आहे.

    “महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे.” असे संजय राऊत म्हणाले होते. त्यामुळे अनिल परब यांना हे सरकार स्वतःहून अटक करेल अशी शक्यता आहे. अनिल परब यांच्याविरोधातील तक्रार तयार आहे. जर सरकारने स्वतःहून अटक केली नाही, तर आम्ही लवकरच तक्रार दाखल करू, असा इशारा पाटील यांनी दिला.

    शिवसेना खासदार संजय राऊत हे जनतेतून निवडून येत साधे नगरसेवकही झाले नाहीत, त्यामुळे कोण शहाणे आणि कोण वेडे हे त्यांनी ठरवू नये. तो अधिकार केवळ मतदारांनाच असतो आणि मतदार सुज्ञ आहेत. मतदानाच्या वेळी मतदार आपला अधिकार चोख बजावतील, असा टोला त्यांनी लगावला.

    मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली की मराठा आरक्षण प्रश्नी केंद्र सरकारने आपल्या अखत्यारीत येणारे सर्व प्रश्न सोडवले असून आता अनेक गोष्टी राज्य सरकारच्याच हाती आहेत. त्यामुळे आपल्याच निष्काळजीपणामुळे गेलेले आरक्षण मराठा समाजाला पुन्हा मिळवून देण्यासाठी आतातरी महाविकास आघाडी सरकारने ठोस पाऊले उचलावीत असे ते म्हणाले.