ओबीसींचे आरक्षण मागू नका; मंत्री विजय वडेट्टीवारांचा मराठा नेत्यांचा इशारा

आमचा मराठा समाजावर रोख नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्याला आमचा अजिबात विरोध नाही. उलट आम्ही पाठिंबाच देऊ. मात्र, प्रस्थापितांनी ओबीसीमधून आरक्षण मागू नये. आमच्या आरक्षणात प्रस्थापित आले तर इथे कोण टिकणार? हात जोडून विनंती करतो पण ओबीसींमधून आरक्षण मागू नका. ओबीसींना, भटक्या विमुक्तांना आरक्षण देण्यासाठी आम्ही वाट्टेल ते करू. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाया पडायलाही तयार आहे.

    मुंबई : राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार(Minister Vijay Vadettiwar) यांनी ओबीसी आरक्षणावरून(OBC Reservation) मराठा नेत्यांना इशारा दिला आहे. आमचा मराठा समाजावर रोख नाही. मराठा आरक्षणाला आमचा विरोधही नाही. मात्र, प्रस्थापितांनी ओबीसींमधून आरक्षण मागू नये, असे आवाहन वडेट्टीवार यांनी केले आहे. भटक्या विमुक्त जाती-जमाती मुक्ती दिनाचे औचित्य साधून सोलापुरात भटक्या विमुक्त व ओबीसींचा राज्यस्तरीय निर्धार मेळावा पार पडला. या कार्यक्रमात वडेट्टीवार हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

    ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळत नसेल तर वडेट्टीवार यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि सरकारमधून बाहेर पडावे, अशी मागणी माकपा नेते, माजी आमदार नरसय्या आडम यांनी केली. ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केले आहे. इम्पिरिकल डेटा वेळेवर सादर न केल्याने हे आरक्षण रद्द झाले आहे. इम्पिरिकल डेटा सादर करण्यासाठी राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवत आहे तर केंद्र सरकार राज्याकडे बोट दाखवत आहे. हा खेळ आता थांबवा. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील ओबीसी आहेत. त्यांनी या आरक्षणाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करू नये, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

    आमचा मराठा समाजावर रोख नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्याला आमचा अजिबात विरोध नाही. उलट आम्ही पाठिंबाच देऊ. मात्र, प्रस्थापितांनी ओबीसीमधून आरक्षण मागू नये. आमच्या आरक्षणात प्रस्थापित आले तर इथे कोण टिकणार? हात जोडून विनंती करतो पण ओबीसींमधून आरक्षण मागू नका. ओबीसींना, भटक्या विमुक्तांना आरक्षण देण्यासाठी आम्ही वाट्टेल ते करू. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाया पडायलाही तयार आहे.

    - विजय वडेट्टीवार, मदत व पुनर्वसन मंत्री