Don't try to suppress the agitation of Maratha community otherwise ... Pravin Darekar's warning

महाविकास आघाडी सरकारने समाजा समाजा मध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करु नये. ओबीसी समाज, मराठा समाज यामध्ये वाद लावण्याचा प्रयत्न सरकारकडून होत आहे असा आरोप करताना दरेकर म्हणाले की, या दोन्ही समाजाच्या वादाने उद्या राज्यात अराजकता माजू शकेल. त्यामुळे ओबीसी समाजाचे आरक्षण त्या समाजाला राहू द्या आणि मराठा समाजाच्या तरुणांची मागणी मान्य  करा अशी मागणीही त्यांनी केली.

मुंबई : गेल्या वर्षभरात महाविकास आघाडी सरकारची जुलमी राजवट राज्यात सुरु आहे. जो कोणी सरकारच्या विरोधात बोलेल त्यांना जेलमध्ये टाकण्याचे प्रकार सध्या सुरु आहेत. मराठा मोर्चासाठी निघालेल्या आंदोलकांना मुंबईत येण्यापासून रोखण्यासाठी त्यांना नवी मुंबई, नाशिक येथे अडविले जात आहे. परंतु अशा प्रकारे आंदोलकांना अडवून हे आंदोलन दाबता येणार नाही. जेवढे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न होईल तेवढे सरकारला त्याचे परिणाम भोगावे लागतील. मराठा समाजाच्या तरुणांच्या भावनांशी खेळू नका. लोकशाही मार्गाने मराठा समाजाचे तरुण जर आंदोलन करत असतील तर त्यांना रोखणे असंविधानिक आहे, त्यामुळे आंदोलक तरुणांना मुंबईत येऊ द्या अन्यथा ज्या ठिकाणी या तरुणांना अडविले जाईल त्या ठिकाणी मी विरोधी पक्ष नेता म्हणून उपस्थित राहील आणि जर यामुळे  कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आली तर त्याची जबाबदारी सरकारची राहील असा जोरदार इशारा विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज दिला आहे.

१३ व १४  डिसेंबर रोजीच्या न्यायालयीन स्थगिती आदेशाच्या अगोदर नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले २१८५ SEBC मराठा समाजाचे उमेदवार आपल्या मागणीसाठी आझाद मैदान येथे उपोषणाला बसले आहेत. विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज आझाद मैदान येथे जाऊन मराठा आंदोलकांची भेट घेतली व त्यांच्या मागण्या समजून घेतल्या.  त्यानंतर प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना दरेकर म्हणाले की, या सरकारच्या काळात मोगलाईच राज्य सुरु आहे मुख्यमंत्री जे बोलतात त्यामधील कोणतीही गोष्ट होत नाही, ते आश्वासन देतात परंतु त्या आश्वासनाची पूर्तता मात्र होत नाही.

अतिवृष्टीमधील शेतकऱ्यांना आश्वासन दिले पण ते पूर्ण केले नाही. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना नोकरीमध्ये आठवड्यात सामील करण्याचे आश्वासनही सरकारने दिले होते. पण, आज ८ महिने झाले तरी हे आश्वासन पूर्ण झालेले नाही. जर तुम्ही स्वतःला वचन पाळणारे मुख्यमंत्री असे म्हणवून घेत असाल तर विद्यार्थाना ८ महिन्यापूर्वी दिलेले वचन ते तात्काळ पूर्ण करावे असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.

महाविकास आघाडी सरकारने समाजा समाजा मध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करु नये. ओबीसी समाज, मराठा समाज यामध्ये वाद लावण्याचा प्रयत्न सरकारकडून होत आहे असा आरोप करताना दरेकर म्हणाले की, या दोन्ही समाजाच्या वादाने उद्या राज्यात अराजकता माजू शकेल. त्यामुळे ओबीसी समाजाचे आरक्षण त्या समाजाला राहू द्या आणि मराठा समाजाच्या तरुणांची मागणी मान्य  करा अशी मागणीही त्यांनी केली.

मराठा समाजाच्या तरुणांनी आतापर्यंत जो संयम दाखवला आहे तो कायम ठेवावा.वैफल्यातून कोणतीही कृती करू नये असे आवाहनही दरेकर यांनी यावेळी केले.

शासनाकडून ४ मे चा दाखवून कोर्टात सांगितले की आम्ही नोकर भरती करणार नाही. त्या अनुषंगाने माननीय सुप्रीम कोर्टाने ९ सप्टेंबर रोजी दिलेल्या निर्णयात, आरक्षण लागू न करता  पुढील नोकरभरती करावे असे सांगितले. परंतु यामुळे २१८५ पदासाठी विविध विभागातील ( तलाठी महावितरण राज्यसेवा मेट्रो इ.) उमेदवार नियुक्ती पासून वंचित राहिले. या उमेदवारीची निवडप्रक्रिया पूर्ण झालेली आहे. या उमेदवारांची माहिती सरकारने कोर्टात दिली असती तर कोर्टाने त्यासाठी नक्की मान्यता देऊन जसे वैद्यकीय प्रवेशासाठी सूट दिली तशी सूट त्या निर्णयात नक्की दिली असती आणि या नोकरभरती मध्ये दिरंगाई झाली नसती असेही दरेकर यांनी सांगितले.

मराठा समाजाच्या या उमेदवारांना आता उपोषणाशिवाय पर्याय राहिलेला नाही, त्यामुळे सरकारने आता तरी योग्य पाऊले उचलून या २१८५ उमेदवारांची तातडीने नियुक्ती करावी आणि रखडलेल्या सर्व नियुक्त्या पूर्णत्वास न्याव्यात ज्याने इतर संबंधित विभागातील सरकारी कामेही रखडणार नाहीत तसेच हि प्रक्रिया गतिमान झाल्याने इतर समाजातील उमेदवारांनाही त्वरित नियुक्त्या मिळतील अशी मागणीही दरेकर यांनी यावेळी केली.