९० प्लस गुण मिळवणारे विद्यार्थ्यांची संख्या दुप्पट; अकरावीला तीन लाखावर जागा

    मुंबई : मुंबईचा सुमारे ९९. ९६ टक्के निकाल लागला आहे. या वाढलेल्या निकालात यंदा ९०प्लस गुण मिळवणारे विद्यार्थ्यांची संख्या गेल्यावर्षीच्या संख्येपेक्षा दुप्पट आहे. त्यामुळे गुणवंत विद्यार्थी वाढले असल्याने टक्केवारीच्या फुगवट्यामुळे नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी मुंबईत अकरावीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्यामध्ये मोठी चुरस होण्याची शक्यता असली तरी अकरावी प्रवेशाच्या सीईटीच्या गुणांना अधिक महत्व राहणार आहे.

    यंदा मुल्यमापन धोरणामुळे निकाल मोठ्या संख्येने वाढला आहे. उतीर्ण विद्यार्थीही मुंबई विभागात साडेतीन लाखावर आहेत. सीईटीच्या गुणावर जरी प्रवेश झाले तरीही नामवंत महाविद्यालयाचे कटऑफ गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी आणखी वाढण्याची शक्यता असल्याची माहिती आता प्राचार्य देत आहेत.
    नव्वदी प्लस विद्यार्थ्यांना सीईटीलाही चांगले गुण मिळाल्यास अकरावी प्रवेशात चांगल्या महाविद्यालयांचा पसंतीक्रम निवडल्यानंतर महाविद्यालयातील जागा मिळवण्यासाठी मग स्पर्धा लागणार आहे हे मात्र निश्चित आहे.

    त्यामुळे कटऑफ वाढेल गतवर्षी असलेला कटऑफ आणि यंदा यामध्ये मोठा फरक असणार आहे. त्यामुळे नामवंत महाविद्यालयातील जागा पहिल्या दोन फेरीतच पूर्ण होतील असेही प्राचार्य सांगत आहेत.

    दहावीचा निकाल जाहीर झाला मात्र आता अकरावीच्या सीईटीची प्रतिक्षा विदयार्थ्यांना आहे. यासंदर्भात वेळापत्रक कधी जाहीर होते. याची वाट पहावी लागणार आहे. ही परीक्षा ऑफलाइन होणार असली तरी कोरोना संकटाची चाचपणी आता पुन्हा बोर्डाला करावी लागणार आहे.