कोरोनाला गांभीर्याने घेऊ नका म्हणणा-या डॉ.अनिल पाटील यांचे निधन

मुंबई :  “कोरोना चायनिज फॅड आहे, त्याला गांभीर्याने घेऊ नका”, असे वक्तव्य करुन चर्चेत आलेले डॉक्टर अनिल पाटील यांचे निधन झाले आहे. अनिल पाटील यांच्या वक्तव्याप्रकरणी त्यांना राज्य वैद्यकीय परिषदेकडून नोटीसही पाठवण्यात आली होती. मार्च महिन्यात मुंबईत कोरोनाचे संकट वाढत चालल्यानंतर अनिल पाटील यांनी हे वक्तव्य केले होते, ते समूह माध्यमांत मोठ्या प्रमाणात व्हायरलही झाले होते. अनिल पाटील यांचा मृत्यू मधुमेहासह विविध आजारांमुळे झाला असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

५२ वर्षीय अनिल पाटील यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली आहेत. उपलब्ध माहितीनुसार, अनिल पाटील यांना सुरुवातीला मुलुंडमधील फोर्टीसमध्ये दाखल करण्यात आले होते. किडनीची समस्या जाणवू लागल्यानंतर त्यांना दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. कोरोना नव्हे, तर डायरिया, मलेरिया आणि तीव्र श्वसन त्रास या गंभीर समस्या आहेत. कोरोना ऐवजी या समस्यांवर जास्त लक्ष दिले पाहिजे, असे पाटील म्हणाले होते. कोरोनाला कुणीही घाबरू नये, हे चीनचे फॅड आहे आणि याची कोणतीही भीती नाही, असे आवाहन त्यांनी एका मुलाखतीतून केले होते. कोरोनाबाबत असे दावे केल्यामुळे महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने पाटील यांना कारणे दाखवा नोटीसही पाठवली होती. मुंबईच्या उपनगरात वेदीक्युअर वेलनेस क्लिनिक अँड हॉस्पिटल या नावाने पाटील यांच्या क्लिनिकच्या शाखा होत्या. ते स्वतःला आयुर्वेदिक डॉक्टर असल्याचे सांगत, मात्र ते एमबीबीएस होते. ते महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे नोंदणीकृत डॉक्टर होते.