डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण : आरोपी विक्रम भावेला तुर्तास दिलासा

हिंदू विधिज्ञ परिषदेत माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून काम पाहणारा अशी विक्रम भावेची ओळख आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी सीबीआयनं सचिन अंदुरे, शरद कळसकर आणि हिंदू जनजागृती समितीचे सदस्य वीरेंद्र तावडे यांची चौकशी केल्यानंतर विक्रमला अटक करण्यात आली होती.

  मुंबई – अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक आणि अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी विक्रम भावेला गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने तुर्तास दिलासा दिला. कोरोनामुळे भावेच्या वडिलांचे निधन झाले आहे. त्यांच्या दशक्रियाविधीसाठी तसेच त्यांच्याशी संबंधित बॅंकेच्या व्यावहारिक कामांसाठी पुणे जिल्ह्याबाहेर जाण्यास न्यायालयाने सशर्त परवानगी दिली.

  पुण्यात २० ऑगस्ट २०१३ मध्ये अंनिसचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकरांची ओंकारेश्वर मंदीराजवळ हत्या करण्यात आली होती. आरोपी शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांना मदत केल्याप्रकरणी सीबीआयने हिंदू विधिज्ञ परिषदेत काम कऱणाऱ्या तसेच सनातन सस्थेचा सदस्य असलेल्या विक्रम भावेला अटक केली होती. या आधी ६ मे रोजी उच्च न्यायालयाने भावेला विविध अटीशर्तीसह १ लाखाच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला होता.

  तसेच पासपोर्ट सीबीआयकडे जमा करण्याचे आणि पुणे एनआयए विशेष न्यायालयाच्या कार्यक्षेत्राबाहेर जाण्यास मज्जाव केला होता. गुरुवारी विक्रम भावे करून एक नव्याने अर्ज दाखल करण्यात आला. त्यावर न्या. एस.एस. शिंदे आणि न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठासमोर व्हिसीमार्फत सुनावणी पार पडली.

  तेव्हा, विक्रमच्या वडिलांचे २५ जून रोजी निधन झाले. त्यांच्या दशक्रियाविधीसाठी तसेच परिवारातील लोकांना भेटण्यासाठी आणि वडिलांशी संबंधित बॅंकेच्या व्यावहारिक कामांसाठी कोकणातील रत्नागिरी येथील मुरडे येथे जाण्यास परवानगी देण्यात यावी. मात्र, न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्ह्याबाहेर जाण्यास मज्जाव करण्यात आल्यामुळे न्यायालयाने आपल्याला चार आठवड्यांसाठी रत्नागिरी जाण्यास अनुमती द्यावी, अशी मागणी भावेच्यावतीने करण्यात आली.

  त्याची दखल घेत चार आठवडे जिल्ह्याबाहेर जाण्यास अनुमती देता येणार नाही असे स्पष्ट करत खंडपीठाने भावेला १० ऑगस्टपर्यंत पुणे जिल्ह्याबाहेर जाण्यास परवानगी दिली. मात्र, यादरम्यान, भावेला रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथील देवरुख पोलीस ठाण्यात दर रविवारी हजेरी लावण्यास सांगितले. त्याबाबत देवरूख पोलिसांना कळविण्याचे निर्देशही दिले. तसेच १० ऑगस्ट रोजी पुण्यातील डेक्क्न पोलीस ठाण्यात येऊन हजेरी लावण्याचे तसेच त्यासंदर्भातील तपशील सादर करण्याचे निर्देश देत खंडपीठाने सुनावणी तहकूब केली.

  हिंदू विधिज्ञ परिषदेत माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून काम पाहणारा अशी विक्रम भावेची ओळख आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी सीबीआयनं सचिन अंदुरे, शरद कळसकर आणि हिंदू जनजागृती समितीचे सदस्य वीरेंद्र तावडे यांची चौकशी केल्यानंतर विक्रमला अटक करण्यात आली होती.

  डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याचा आरोप त्याच्यावर असून दाभोलकरांची ओळख पटवण्यात तसेच दाभोलकरांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेले पिस्तूल नष्ट करण्यातही विक्रमचा सहभाग होता. याआधी ठाण्यातील गडकरी रंगायतन आणि पनवेलमधील थिएटरमध्ये ४ जून २००८ रोजी झालेल्या बॉम्बस्फोटाप्रकरणी त्याला दोषी ठरवण्यात आले होते.