लॉकडाऊनमुळे विद्यार्थी डिजिटल ”लॉकअप”मध्ये, १ जूनपासून मराठी माध्यमाच्या शाळांचे नियमित डिजिटल वर्ग

मुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पुढील दोन महिने शाळा सुरु होण्याची शक्यता कमी असल्याने मराठी माध्यमाच्या शाळांनी आता डिजिटल वर्ग भरवण्यास सुरुवात केली आहे. एक एप्रिलपासूनच मोबाईलवर

 मुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पुढील दोन महिने शाळा सुरु होण्याची शक्यता कमी असल्याने मराठी माध्यमाच्या शाळांनी आता डिजिटल वर्ग भरवण्यास सुरुवात केली आहे.  एक एप्रिलपासूनच मोबाईलवर अनौपचारिक अभ्यासवर्ग आयोजित करणाऱ्या सायनच्या शिव शिक्षण संस्थेच्या डी. एस. हायस्कूलने १ जूनपासून शाळेचे नियमित डिजिटल वर्ग घेण्याची तयारी केली आहे.

चालू शैक्षणिक वर्षात अभ्यासक्रम पूर्ण शिकवण्याचे आव्हान शाळांसमोर आहे. त्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही प्रायोगिक पातळीवर झूम एपवर पहिली ते दहावीचे वर्ग एप्रिल व मेमध्ये घेतले. काही तुकड्यांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती ९५ टक्के असायची, तर काही तुकड्यांमध्ये ६० ते ७० टक्के असायची.

 त्यामुळे आता १ जूनपासून शाळेने नियमित डिजिटल वर्ग घेण्याचा निर्णय घेतला आहे. दररोजच्या ४० मिनिटांच्या प्रत्येकी चार तासिकांना विद्यार्थ्यांची उपस्थिती १०० टक्के लागावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे डी. एस. हायस्कूलचे अध्यक्ष राजेंद्र प्रधान यांनी सांगितले. 

शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांना विश्वासात घेण्यासाठी आम्ही गेल्या दोन महिन्यात अनेकदा ऑनलाईन पालक सभा घेतल्या आणि पालकांच्या मनातील शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न केला, असेही राजेंद्र प्रधान यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांच्या मनात कोरोनाची भीती, लॉकडाऊन आणि डिजिटल वर्गांचा ताण निर्माण होऊ नये, यासाठी शाळेच्या सुमपदेशिका प्राजक्ता भाटकर व त्यांचे सहकारी विद्यार्थी-विद्यार्थिनींशी नियमित संवाद साधत आहेत. कोरोना काळात विद्यार्थी डिजिटल ‘लॉकअप’मध्ये असले तरी त्याचे दुष्परिणाम त्यांच्यावर होऊ नयेत, यासाठी पालकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. घर कितीही लहान असले तरी मुलांकडून पालकांनी सूर्यनमस्कारसारखे शारीरिक व्यायाम करवून घ्यायलाच हवेत. मुलांसोबत बैठे खेळ खेळून तसेच सहज गप्पा-टप्पा मारत त्यांच्याशी सतत संवाद साधला पाहिजे सध्याचा हा संकटकाळ कायम राहणार नसून मुलांमध्ये सकारात्मक दृष्टीकोन आणि दुर्दम्य इच्छाशक्ती निर्माण करण्यावर घरातील वडीलधा-यांनी विशेष लक्ष द्यायला हवं” असं समुपदेशिका प्राजक्ता भाटकर यांनी सांगितलं.