खासगी वाहनांसाठी ई-पास बंधनकारकच; गृहमंत्री अनिल देशमुख

केंद्र सरकारने राज्यांतर्गत वाहतुकीवरील निर्बंध हटवले आहेत. परंतु महाराष्ट्रात खासगी वाहनांसाठी ई-पास बंधनकारकच असणार आहे. गेल्या काही दिवसांपासून ई-पासची अट मागे घेण्याची मागणी जोर धरू लागली होती. पण ई-पास कायम राहणार असल्याचं राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे.

मुंबई : केंद्र सरकारने राज्यांतर्गत वाहतुकीवरील निर्बंध हटवले आहेत. परंतु महाराष्ट्रात खासगी वाहनांसाठी ई-पास बंधनकारकच असणार आहे. गेल्या काही दिवसांपासून ई-पासची अट मागे घेण्याची मागणी जोर धरू लागली होती. पण ई-पास कायम राहणार असल्याचं राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करून ई-पासबद्दलचा निर्णय घेऊ, अशी माहिती देशमुख यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली होती. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर देशमुख यांनी पुन्हा ट्विट केलं. ‘मिशन बिगिन अंतर्गत जारी असलेली नियमावली पुढील सूचना जाहीर होईपर्यंत कायम असेल,’ असं देशमुख यांनी म्हटलं आहे. त्यामुळे ई-पाससह सध्या लागू असलेले सर्व नियम कायम राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे म्हणून यापुढेही राज्यात खासगी वाहनांमधून प्रवास करताना ई-पास बंधनकारक असणार आहे.

केंद्र सरकारनं कोविड-१९मुळे लॉकडाऊन संदर्भात दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी करताना राज्याराज्यांनी तेथील परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय घेण्याचे अधिकार दिलेले आहेत. राज्य शासनानं काढलेल्या आदेशांची अंमलबजावणी करताना स्थानिक स्वराज्य संस्थांना (महापालिका, नगरपालिका आदी) तेथील परिस्थिती बघून निर्णय घेण्याचे अधिकार दिलेले आहेत. त्यामुळे राज्य शासनानं ई-पास रद्द करण्याचा निर्णय घेतला तरी ई-पास राज्यात सगळीकडेच रद्द होतील असं नाही. काही ठिकाणी ई-पासची सक्ती राहू शकते. राज्य शासनानं आदेश काढूनही त्यांची अंमलबजावणी न करता वेगळे निर्णय लॉकडाऊनच्या काळात काही भागात यापूर्वीही घेण्यात आले आहेत.